ताज्या घडामोडी पुणे शिरूर

भिशी एक, खाती अनेक; कारेगाव प्रकरणात ‘तृतीय खातेदार’ कोण…?

शिरुर | कारेगाव येथील कथित भिशी गैरव्यवहार प्रकरणात आता तपासाचा केंद्रबिंदू केवळ गुन्ह्यातील आरोपींपुरता मर्यादित न राहता पैशांचा नेमका प्रवास शोधण्याकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे. ३९ जणांचे तब्बल २० कोटी ३४ लाख ६५ हजार ५०० रुपये अडकल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर १९ भिशींच्या व्यवहारांची आर्थिक साखळी तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः काही व्यवहारांमध्ये इतर व्यक्तींच्या बँक खात्यांचा वापर झाल्याचे तक्रारीतील तपशीलातून समोर येत असल्याने या ‘तृतीय खातेदारां’ची भूमिका तपासण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणी सुलभा शरद नवले, नितीन शरद नवले, सुहास शरद नवले, अश्विनी नितीन नवले आणि प्रतिक्षा सुहास नवले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, व्यवहाराची व्याप्ती पाहता रक्कम कोणाकडून जमा झाली, कोणत्या खात्यात गेली आणि त्यानंतर कुठे वळवली गेली, याचा मागोवा घेणे तपासासाठी निर्णायक ठरू शकते.

या एका व्यवहारातून मोठा प्रश्न समोर येतो की, फिर्यादी बारकू चंदर सोनवणे यांनी स्वतःसह कुटुंबीयांच्या माध्यमातून भिशीत मोठी रक्कम गुंतवल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या व्यवहारात ऑनलाइन आणि रोख रकमेचा समावेश आहे. त्यातील काही रक्कम आयोजक कुटुंबातील व्यक्तींच्या खात्यांऐवजी इतर व्यक्तींच्या खात्यांमध्ये जमा झाल्याचा तपशील तक्रारीत आहे. यामुळे तपासासमोर महत्त्वाचे प्रश्न उभे राहतात. संबंधित खाती कोणाची होती? त्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगणारी व्यक्ती कोण? खातेदारांना व्यवहाराचे स्वरूप माहीत होते का? खात्यात आलेली रक्कम त्यांच्याकडेच राहिली की पुढे दुसऱ्या खात्यात हस्तांतरित झाली? अशा खात्यांचा वापर इतर भिशींच्या व्यवहारातही झाला का? या प्रश्नांची उत्तरे बँक स्टेटमेंट, डिजिटल व्यवहार आणि संबंधित व्यक्तींच्या जबाबांतून स्पष्ट होऊ शकतात.

या प्रकरणातील सर्व भिशींचा स्वतंत्र आर्थिक ताळेबंद करणे आवश्यक आहे. कारेगावमध्ये १९ भिशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी १७ भिशींची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक भिशीचा स्वतंत्र आर्थिक ताळेबंद तयार करणे आवश्यक आहे. म्हणजेच प्रत्येक भिशीत किती सदस्य होते, दरमहा किंवा ठराविक कालावधीत किती रक्कम जमा झाली, कोणत्या सदस्याला किती रक्कम देण्यात आली आणि किती रक्कम शिल्लक राहिली, याचा तपशील एकत्रित केल्यास संपूर्ण व्यवहाराचे चित्र स्पष्ट होऊ शकते. त्याचबरोबर एका व्यक्तीच्या खात्यात वेगवेगळ्या भिशींमधून रक्कम जमा झाली का, याची पडताळणीही महत्त्वाची ठरणार आहे.

तृतीय व्यक्तीच्या खात्यात रक्कम कधी जमा झाली? किती जमा झाली? त्यानंतर ती रक्कम कुठे गेली? संबंधित खातेदाराला त्याचा आर्थिक फायदा झाला का? अशा प्रश्नांच्या आधारे तपास केल्यास प्रत्यक्ष आर्थिक भूमिका स्पष्ट होऊ शकते.पैसा कुठून आला आणि कुठे गेला? हाच कळीचा प्रश्न आहे. यात कोट्यवधी रकमेची उलाढाल असल्याने एक मनी ट्रेल हा तपासाचा अत्यंत महत्त्वाचा भाग ठरतो. म्हणजेच प्रथम गुंतवणूकदार – भिशीचा आयोजक – बँक खाते – तृतीय खातेदार – पुढील हस्तांतरण – अंतिम लाभार्थी…! या संपूर्ण साखळीचा मागोवा घेतल्यास पैशांचा प्रत्यक्ष प्रवास स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यासाठी बँक खात्यांची स्टेटमेंट, यूपीआय व्यवहार, चेक व्यवहार, रोख रकमेच्या नोंदी, भिशीच्या पावत्या, वह्या आणि सदस्यांचे जबाब यांची सांगड घालणे आवश्यक आहे.

रांजणगाव पोलिसांनी या भिशीत आर्थिक फसवणूक झालेल्या आणखी व्यक्तींनी पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सध्या समोर आलेल्या ३९ जणांव्यतिरिक्त आणखी गुंतवणूकदार आहेत का, याचीही चौकशी होणे अपेक्षित आहे. पोलिस ठाण्यात नव्या तक्रारी दाखल झाल्यास या प्रकरणातील आर्थिक व्यवहाराची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आता या प्रकरणात केवळ ‘आरोपी कोण?’ एवढ्यावर तपास थांबण्यापेक्षा ‘पैसा कुठून आला, कोणत्या खात्यात गेला आणि अखेरीस कोणाकडे पोहोचला?’ या तीन प्रश्नांची उत्तरे शोधणे महत्त्वाचे ठरणार आहे. १९ भिशींच्या व्यवहारातील प्रत्येक खात्याचा मागोवा घेतला गेल्यास या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक उलाढालीमागील प्रत्यक्ष व्यवहारांची साखळी आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिका अधिक स्पष्ट होऊ शकतात.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!