ताज्या घडामोडी पुणे शिरूर

कुटुंबापलीकडेही आर्थिक धागे..? १९ भिशींच्या तपासाने वाढली उत्सुकता !

 गुंतवणूकदारांचे २० कोटीहून अधिक रुपये अडकल्याचा आरोप; नवले कुटुंबापलीकडे आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी….

शिरुर | कारेगाव येथील कथित भिशी गैरव्यवहार प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, तब्बल १९ भिशांच्या माध्यमातून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे. दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून ३९ गुंतवणूकदारांची २० कोटी ३४ लाख ६५ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सुलभा शरद नवले, नितीन शरद नवले, सुहास शरद नवले, अश्विनी नितीन नवले आणि प्रतिक्षा सुहास नवले यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस तपासाला वेग आला आहे.

मात्र, प्रकरणातील रक्कम आणि भिशींची संख्या पाहता तपास केवळ गुन्ह्यातील आरोपींपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण आर्थिक व्यवहाराची साखळी तपासण्याची मागणी तक्रारदारांकडून होत आहे.

कारेगावमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल १९ भिशी सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यापैकी १७ भिशींच्या व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक भिशीमध्ये किती सदस्य होते, प्रत्येकाकडून किती रक्कम जमा करण्यात आली, किती रक्कम परत करण्यात आली आणि किती रक्कम अद्याप अडकली आहे, याचा स्वतंत्र तपास आवश्यक ठरणार आहे. भिशीच्या नावाखाली जमा झालेली रक्कम नेमकी कोणत्या व्यक्तीच्या ताब्यात होती? ती कोणत्या बँक खात्यात जमा होत होती? ऑनलाइन किंवा रोखीने व्यवहार करण्यात आले का? भिशीच्या पावत्या, वह्या आणि इतर आर्थिक नोंदींमध्ये काय माहिती आहे? या प्रश्नांची उत्तरे तपासातून स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

दरम्यान, भिशीच्या व्यवहारांमध्ये काही जवळच्या नातेवाईकांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भूमिका होती का, याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे. मात्र, केवळ चर्चा किंवा आरोपांच्या आधारे कोणालाही दोषी ठरवता येणार नाही, हेही महत्त्वाचे आहे. संबंधित व्यक्तींची भूमिका असल्यास ती बँक व्यवहार, कागदपत्रे, आर्थिक नोंदी आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे तपासणे आवश्यक आहे. तक्रारदारांकडूनही भिशीच्या व्यवहारांमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या किंवा आर्थिक नियंत्रण ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

या प्रकरणाचा तपास करताना ‘पैसा कुठून आला आणि कुठे गेला?’ या सूत्रावर आर्थिक तपास केंद्रित केल्यास संपूर्ण व्यवहाराचे चित्र स्पष्ट होऊ शकते. १९ भिशींच्या सर्व नोंदींची छाननी, बँक खात्यांची पडताळणी, रोख व्यवहार, ऑनलाइन ट्रान्झॅक्शन, पावत्या, वही-हिशोब आणि गुंतवणूकदारांचे जबाब यांची सांगड घालणे महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे प्रत्यक्षात किती रक्कम जमा झाली आणि त्यातील किती रक्कम कुठे वळवण्यात आली, याचा मागोवा घेणे पोलिसांना शक्य होऊ शकते.

याबाबत रांजणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी सांगितले की, “कारेगाव भिशी प्रकरणात कुणाकुणाची आर्थिक फसवणूक झाली, फसवणूक झालेल्या व्यक्तींनी भिशीत रक्कम कोणत्या स्वरूपात गुंतविली आणि या कथित व्यवहारात नेमके कोणाचे किती पैसे अडकले आहेत, याचा सविस्तर तपास सुरू आहे. या भिशीत आणखी कोणाची आर्थिक फसवणूक झाली असेल, तर त्यांनी पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दाखल करावी.”

आता पोलिसांच्या आर्थिक तपासातून १९ भिशींचा संपूर्ण हिशोब, अडकलेल्या रकमेचे वास्तविक चित्र आणि या व्यवहारामध्ये आणखी कोणाची भूमिका होती का, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारेगावसह संपूर्ण शिरुर तालुक्याचे लक्ष या तपासाकडे लागले आहे.

क्रमशः …..

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!