राजकीय शिरूर

जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी शिरुरच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच..!

शिक्रापूर | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होऊ घातली आहे. पुणे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात स्व. अजित पवार यांचा दबदबा कायम होता. यावेळी मात्र अजित पवार यांच्या शिवाय ही निवडणूक होणार असल्याने उमेदवारीसाठी अनेकांनी विविध प्रकारे फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.

शिरुर तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार अशोक पवार हे केवळ एकच उमेदवार इच्छुक आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून स्वप्नील गायकवाड आणि राजेंद्र जासूद या दोघांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सहकारी संस्था मतदार प्रतिनिधी ठराव आपल्या विचारांच्या सहकाऱ्यांना मिळावा यासाठी तीनही इच्छुक उमेदवारांनी तगडी फिल्डिंग लावली होती. यामध्ये गेल्या दोन निवडणुकांचा अनुभव असल्याने स्वप्नील गायकवाड यांनी सर्वाधिक ठराव आपल्या विचारांच्या सहकाऱ्यांचे झाले असल्याचा दावा केला आहे. तर अशोक पवार यांच्या बाजूने देखील सर्वाधिक ठराव असल्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान शिरुर तालुका हा दोन विधानसभा मतदारसंघात विभागला असल्याने ४२ गावं ही माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे वर्चस्व असलेल्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघात येतात १३० मतदारांपैकी ५० हुन अधिक मतदार हे आंबेगाव मतदारसंघातील आहे. गेल्या निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांनी ही सर्व मते अशोक पवार यांच्या पारड्यात टाकली होती, मात्र ती आमची चूक झाली होती, अशी जाहीर भूमिका अनेकदा वळसे पाटील यांनी जाहीर व्यासपीठावर व्यक्त केली आहे.

अगोदरच शिरूरच्या पूर्व भागातील शेतकरी घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडल्याने अशोक पवार यांच्यावर नाराजी व्यक्त करत आहे. त्यातच स्वप्नील गायकवाड यांनी पूर्व भागातील सहकारी संस्था प्रतिनिधी ठराव सर्वाधिक आमच्या विचारांचे असल्याचा दावा केला आहे. तर राजेंद्र जासूद हे देखील पूर्व भागातील ठारांवसाठी तळ ठोकून होते.

माजी आमदार अशोक पवार यांनी गेल्या निवडणूकीत एकहाती विजय मिळवला होता यावेळी मात्र विरोधातील इच्छुकांची संख्या वाढल्याने त्यातच गायकवाड आणि जासूद यांच्यात मनोमिलन झाल्यास निकालाचे चित्र अस्पष्ट आहे. दरम्यान या निवडणुकीत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि आमदार ज्ञानेश्वर कटके यांची भूमिका सर्वाधिक महत्वाची ठरणार आहे.

जिल्हा बँक ही शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी संबंधित आहे. माझे वडील स्व. अरुणआबा गायकवाड यांनी थेट शेतकऱ्यांना या बँकेच्या माध्यमातून लाभ मिळवून दिला. मला बँकेच्या माध्यमातून माझ्या कोणत्याही व्यवसायाला नफा मिळवायचा नाही किंवा माझा कोणताही खाजगी कारखाना नाही. जिरवाजीरवीचे राजकारण न करता शेतकऱ्यांसाठी ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवायची हा ठाम निर्धार मी केला आहे. – स्वप्नील गायकवाड ( इच्छुक उमेदवार)

error: Copying content is not allowed!!!