शिरूर (प्रतिनिधी) : मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यालगत असलेल्या एकनाथ दंडवते यांच्या घरावर मध्यरात्रीच्या सुमारास ७ ते ८ जणांच्या सशस्त्र टोळक्याने दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली. दरोडेखोरांनी घरातील एकनाथ दंडवते आणि त्यांच्या ८० वर्षीय पत्नी यमुनाबाई दंडवते यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यमुनाबाई यांच्या कानातील कर्णफुले ओरबाडून काढण्यासह नाकातील नथ आणि गळ्यातील सोन्याची पोत असा अंदाजे दोन ते तीन तोळे सोन्याचा ऐवज लुटून दरोडेखोर पसार झाले. या घटनेमुळे मलठणसह टाकळी हाजी, कवठे येमाई आणि परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास दंडवते दाम्पत्य घरात झोपलेले असताना ७ ते ८ जणांच्या टोळक्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर दरोडेखोरांनी लोखंडी रॉडने दोघांवर हल्ला चढवला. यामध्ये ८० वर्षीय यमुनाबाई यांच्या कानातील कर्णफुले अक्षरशः ओरबाडून नेल्याने त्या जखमी झाल्या. दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने लुटून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. टाकळी हाजी पोलीस चौकीचे पीएसआय गोविंद खटिंग आणि एएसआय राजेंद्र चव्हाण यांनीही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. स्थानिक गुन्हे शाखेकडून तपासाची चक्रे फिरविण्यात आली आहेत.
दरम्यान, टाकळी हाजी औटपोस्टच्या हद्दीत यापूर्वीही विद्युत रोहित्र, विद्युत मोटारी, केबल, दुचाकी चोरीसह विविध चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. आता थेट घरात घुसून वृद्ध दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला करून दरोडा टाकण्याचा प्रकार घडल्याने पोलीस गस्त आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी प्रभावी गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसुरक्षा यंत्रणा सक्षम करण्याची गरज
येत्या काळात दुष्काळाचे सावट गडद होण्याची शक्यता लक्षात घेता ग्रामीण भागातील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. पाणीटंचाई आणि रोजगाराच्या शोधात होणारी स्थलांतरे यांसारख्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गावातील सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. केवळ पोलीस प्रशासनावर अवलंबून न राहता प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
गावातील स्थानिक युवकांनी पुढाकार घेऊन रात्रीच्या वेळी टप्प्याटप्प्याने गस्त घालणे, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, अनोळखी व्यक्तींची माहिती घेणे आणि कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास तातडीने पोलिसांना कळविणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन आणि स्थानिक युवक यांच्यात समन्वय निर्माण झाल्यास अशा घटनांना आळा घालण्यास मदत होऊ शकते. मलठणमधील घटनेने संपूर्ण परिसराला सावध होण्याचा इशारा दिला असून, आता ग्रामसुरक्षेसाठी सामूहिक पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.











Add Comment