शिरूर : शिरूरचे तत्कालीन तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या कार्यकाळात दिलेल्या सर्व महसुली जमीन प्रकरणांतील आदेशांना तात्काळ स्थगिती देऊन त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष सुशांत किशोर कुटे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बांधकाम प्रकल्पाच्या लिलाव प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशी व निलंबनाबाबत विचार करण्याचे राज्य सरकारला निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब म्हस्के यांच्या कार्यकाळात झालेल्या इतर महसुली प्रकरणांबाबतही संशय निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
गौण खनिज, कुळकायदा, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम १५५ अंतर्गत दुरुस्ती तसेच इतर महसुली जमीन प्रकरणांमध्ये दिलेल्या आदेशांची स्वतंत्र व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित सर्व आदेशांना तात्पुरती स्थगिती देण्याची विनंती महसूल मंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, या निवेदनातील आरोप हे भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी केलेले दावे असून, संबंधित प्रकरणांबाबत शासनाकडून किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.











Add Comment