Uncategorized क्राईम ताज्या घडामोडी पुणे

रांजणगावात चार महिलांची ‘सिल्वर हायस्ट’;ज्वेलर्स व्यावसायिकाला लाखोंचा फटका|

रांजणगाव | पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील महावीर ज्वेलर्स या सराफा दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अनोळखी महिलांनी चक्क 1 लाख 82 हजार रुपये किमतीचे चांदीचे जोडवे लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि. 23) दुपारी घडली. या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी महिलांचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावीर ज्वेलर्सचे प्रणय दिलीप वर्मा (वय 30) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि. 23 जुलै रोजी दुपारी 2.30 ते 3.10 या वेळेत चार अनोळखी महिला ग्राहक असल्याचे भासवत दुकानात आल्या. त्यांनी चांदीचे दागिने पाहण्याच्या आणि खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानदाराचे लक्ष दुसरीकडे वळवले. त्याचवेळी त्यांनी 82 नग चांदीचे डबल वेढा जोडवे, अंदाजे 760 ग्रॅम वजनाचे आणि 1 लाख 82 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले.

चोरीस गेलेल्या जोडव्यांवर आतील बाजूस “महावीर ज्वेलर्स” असा ओळख दर्शविणारा मार्क असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर दुकानदाराने तातडीने रांजणगाव MIDC पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305 (अ) अन्वये अनोळखी चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून, पोलीस हवालदार चव्हाण पुढील तपास करत आहेत

दरम्यान, सराफा व्यावसायिकांनी दुकानात येणाऱ्या संशयित ग्राहकांवर लक्ष ठेवावे, तसेच सीसीटीव्ही यंत्रणा आणि सुरक्षा उपाय अधिक सक्षम ठेवावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Copying content is not allowed!!!