राजकीय शिरूर

जिल्हा बँकेच्या रिंगणात शिरुरच्या तीन दिग्गजांनी दंड थोपटले..!

शिक्रापूर | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC) निवडणुकीच्या रिंगणात माजी आमदार अशोक पवार यांच्या विरोधात माजी संचालक स्व. अरुणआबा गायकवाड यांचे चिरंजीव स्वप्नील गायकवाड यांनी तगडे आवाहन उभे केले आहे. त्याचबरोबर शिरुर पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र जासूद यांनी देखील या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दंड थोपटले आहेत. सहकारी संस्थांचे प्रतिनिधी ठराव अंतिम टप्प्यात आले असताना शिरुर तालुक्यातील सर्वच भागात मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे जिल्हा बँकेवर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळते की, भाजप पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या चाव्या आपल्या हातात घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. गेल्या निवडणूकित केवळ एक जागा प्रदीप कंद यांच्या रूपाने भाजपने जिंकली होती. यावेळी भाजप या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार याची दिशा आणखी ठरलेली नाही.

शिरुर तालुक्यात मात्र माजी आमदार अशोक पवार आणि स्वप्नील गायकवाड यांच्यात ठराव मिळवण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळते. याचे पडसाद विविध गावांत पडलेले आहेत. ठराव मिळवण्यासाठी हाणामारी पर्यंत प्रकरण गेले आहे. तर पोलिसांत गुन्हा देखील झाला आहे. पोलिसांच्या बंदोबस्तात ठराव घेतले जात आहेत. गेल्यावेळी सहकारातील बँकेची निवडणूक अशोक पवार यांनी एकतर्फी जिंकल्यानंतर एकहाती सत्ता असलेल्या घोडगंगा सहकारी साखर मात्र टाळे लागले. कारखाना बंद पडल्याचा मोठा फटका विधानसभा निवडणुकीत अशोक पवार यांना बसला. विधानसभा निवडणुकीत मोठ्या मतांनी पराभव झाल्यानंतर आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अशोक पवार पुन्हा सक्रिय झाले आहेत.

सलग दोन वेळा जिल्हा बँकेचे संचालक राहिलेले स्व. अरुणआबा गायकवाड यांचे चिरंजीव स्वप्नील गायकवाड यांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिलेले स्वप्नील गायकवाड हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, दिलीप वळसे पाटील आणि पार्थ पवार यांच्या सातत्याने संपर्कात असलेले आणि कोंढापुरी गावचे माजी सरपंच म्हणून उत्तम कामगिरी केलेल्या गायकवाड यांनी माजी आमदार अशोक पवार यांनाच थेट आवाहन दिले आहे. तर दुसरीकडे शिरुर पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र जासूद यांनी देखील या निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवली आहे.

या तिघांच्या उमेदवारीमुळे शिरूर तालुक्यातील जिल्हा बँकेची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. अशोक पवार यांच्याकडे सहकारातील प्रदीर्घ अनुभव आणि संस्थात्मक राजकारणाचा मोठा आधार आहे; स्वप्नील गायकवाड यांच्याकडे अरुणआबा गायकवाड यांचा सहकारातील वारसा, युवकांशी असलेला संपर्क आणि नव्या नेतृत्वाची प्रतिमा आहे; तर राजेंद्र जासूद यांच्याकडे पंचायत समितीतील राजकीय अनुभव आणि स्थानिक पुढाऱ्यांशी संपर्क आहे. त्यामुळे या तिघांपैकी कोण जिल्हा बँकेवर निवडून जाणार, यावर शिरूर तालुक्यातील केवळ जिल्हा बँकेच्या राजकारणाचीच नव्हे तर आगामी विधानसभा निवडणुकीची पुढील दिशा ठरणार आहे.

error: Copying content is not allowed!!!