जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात दीर्घकाळ सक्रिय राहिलेल्या भाजप नेत्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई दत्तात्रय बुचके यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनाने जुन्नर तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि महिला कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
आशाताई बुचके यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केले तसेच जिल्हा परिषदेतील गटनेतेपदाची जबाबदारीही सांभाळली. जुन्नर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये निवडणूक लढवत आपली राजकीय ताकद दाखवून दिली. ऑगस्ट २०२१ मध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर जुन्नर तालुक्यात भाजपची संघटनात्मक बांधणी आणि विविध स्थानिक प्रश्नांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. २०२४च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्यांना ९ हजार ४३५ मते मिळाली.
पुणे जिल्ह्यातील सर्वात आक्रमक महिला नेत्या म्हणून त्यांची ओळख होती. अनेक आंदोलने रस्त्यावर केलेली अनेक निदर्शने आणि त्यामुळे जुन्नर तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचा नावलौकिक होता. जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये त्यांनी घेतलेल्या भूमिका अनेकदा चर्चेचा विषय ठरल्या होत्या, जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि जिल्हा परिषदेमध्ये चालणारा कारभार यामध्ये रणरागिणी म्हणून त्यांची ओळख होती.
जुन्नरच्या राजकारणात आक्रमक आणि स्पष्ट भूमिका घेणाऱ्या नेत्या म्हणून आशाताई बुचके यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने जुन्नर तालुक्यातील राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.











Add Comment