रांजणगाव गणपती | हॉटेलमध्ये कुटुंबासोबत निवांत जेवण सुरू होतं. बाहेर पार्किंगमध्ये उभी असलेली कार मात्र चोरट्यांच्या निशाण्यावर होती. कुटुंब जेवणात व्यस्त असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडली आणि आत ठेवलेली पर्स घेऊन क्षणार्धात पोबारा केला. जेवण आटोपून कुटुंब बाहेर आले, तेव्हा कारची फुटलेली काच आणि गायब झालेली पर्स पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पर्समध्ये सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा सुमारे १ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज होता. ही घटना ३० ऑगस्ट रोजी रात्री रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत घडली. याप्रकरणी शादाब अल्ताफ शेख (वय ४१) यांनी रांजणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शेख हे कुटुंबासह हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आले होते. त्यांनी टाटा टिगोर कार हॉटेलसमोरील पार्किंगमध्ये उभी केली आणि कुटुंबासह हॉटेलमध्ये प्रवेश केला. मात्र, त्याचवेळी बाहेर कोणीतरी त्यांच्या कारवर नजर ठेवून असल्याचा त्यांना किंचितही अंदाज नव्हता. रात्री साडेदहा ते साडेअकराच्या दरम्यान चोरट्यांनी कारच्या मागील बाजूची काच फोडली. आत ठेवलेली पत्नीची पर्स बाहेर काढली आणि कोणालाही संशय येण्यापूर्वीच चोरटे पसार झाले. पर्समध्ये १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, तीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, मोबाईल, चार्जर, चांदीचे कडे आणि पाच हजार रुपये रोख होते. म्हणजेच, कुटुंब हॉटेलमध्ये जेवत असताना बाहेर चोरट्यांनी तब्बल दीड लाख रुपयांच्या ऐवजावर हात साफ केला.
या घटनेनंतर रांजणगाव परिसरातील हॉटेल पार्किंगच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ग्राहक निर्धास्तपणे वाहन पार्क करून हॉटेलमध्ये जात असताना चोरटे त्याच वाहनांवर नजर ठेवून असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. दरम्यान, या चोरट्यांनी घटनेपूर्वी कारची रेकी केली होती का? त्यांना पर्समध्ये मौल्यवान वस्तू असल्याची माहिती होती का? तसेच चोरीनंतर ते कोणत्या दिशेने पसार झाले, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. हॉटेल आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास या संपूर्ण थराराचा उलगडा होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे.











Add Comment