सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल…!
शिक्रापूर | पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूकिला ऐनवेळी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ब्रेक लागला त्यामुळे शिरुर तालुक्यातून सहकारी सोसायटी मतदारसंघातून जोरदार तयारी केलेल्या राजेंद्र जासूद यांनी आपला मोर्चा आता विधानसभा निवडणुकीकडे वळवला असल्याचे समर्थकांच्या माध्यमातून व्यक्त केले जात आहे. प्रामुख्याने जिल्हा बँकेची निवडणूक ही त्यांच्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम असल्याच्या चर्चा सातत्याने होत होत्या. मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीला स्थगिती आल्याने जासूद यांचा मुख्य उद्देश सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट दिसून येत आहे.
शिरुर – हवेली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व पहायला मिळते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी लोकसभा मतदारसंघासह विधानसभा मतदारसंघाची देखील पुनर्रचना झाली. या प्रक्रियेत शिरुरची ६० गावं आणि हवेलीची ४० गावं एकत्रित करून शिरुर – हवेली मतदारसंघ निर्माण झाला. दिवंगत माजी आमदार बाबुराव पाचर्णे आणि माजी आमदार अशोक पवार यांच्यामध्ये सातत्याने या मतदारसंघात संघर्ष पहायला मिळाला.
होऊ घातलेल्या लोकसभा अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडले जाणार आहे तर राज्यात देखील मतदारसंघाची पुनर्रचना होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मतदारसंघ कसा तयार होतो त्यावर आणखी राजकीय गणिते मांडली जाणार आहेत. त्यातच नव्याने शिरुर- हवेली मतदारसंघाला मिळालेले आमदार ज्ञानेश्वर कटके यांचा शिरुर तालुक्यातील संपर्क घटला असल्याच्या चर्चा सातत्याने होत असतात.
यशवंत सहकारी साखर कारखाना, घोडगंगा सहकारी साखर कारखाना हे दोन्ही कारखाने शिरुर – हवेली मतदारसंघात येतात. राज्यात साखर कारखानदारीचा उन्नतीचा काळ असताना आणि शिरूरच्या भागात ऊसाचे उत्पादन वाढले असताना देखील हे दोन्ही कारखाने बंद पडले. मतदारसंघ दोन भागात विभागला गेला आहे. नागरीकरण वाढत आहे, वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होत आहे, चासकमानच्या आवर्तनाचे नियोजन, रोजगाराची समस्या या आणि अशा अनेक समस्या या मतदारसंघात आहेत.
दरम्यान राजेंद्र जासूद यांनी यापूर्वी शिरुर बाजार समिती, शिरुर पंचायत समितीच्या निवडणुकीत आपला करिष्मा दाखवला आहे तर, जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी सातत्याने शिरूरच्या पूर्व भागात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पूर्व भागातील युवकांचे संघटन ही त्यांची जमेची बाजू आहे. तर अनेक निवडणूकीत बजावलेली पडद्यामागची भूमिका त्यामुळे वाढलेला जनसंपर्क यावर आधारित राजेंद्र जासूद यांनी जिल्हा बँकेची निवडणुक लढवण्याचा चंग बांधला होता. माजी आमदार अशोक पवार आणि राजेंद्र जासूद यांच्यात देखील सातत्याने अनेक निवडणुकीत संघर्ष पाहायला मिळाला आहे. आगामी काळात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तो संघर्ष अधिक तीव्र होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे जासूद यांच्या कार्यकर्त्यांकडून “भावी आमदार”, “सेना भी तय्यार हैं, और सेनापती भी”, “जनसेवक” अशा आशयाचे पोस्टर व्हायरल केले जात आहेत.
विधानसभा निवडणुकीला अजून बराच काळ बाकी असला तरी समर्थकांकडून “भावी आमदार” उल्लेखाचे पोस्टर वायरल केल्यामुळे राजेंद्र जासूद यांची महत्त्वकांक्षा काही लपून राहिलेली नाही. यापूर्वी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये देखील राजेंद्र जासूद यांनी विधानपरिषदेच्या निवडणूकीला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली होती. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप पक्षातील वरिष्ठ नेत्यांची असलेले त्यांचे संबंध अनेकदा उघड झालेले आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुक राजेंद्र जासूद लढवणार असल्याचे बोलले जात आहे.











Add Comment