राजकीय • शिरूर

राजाभाऊच्या कुटुंबाला अंतर देणार नाही; कार्यकर्त्याच्या निधनाने वळसे पाटील भावुक..!

(संग्रहित फोटो – दिलीप वळसे पाटील आणि राजेंद्र ढोकले एकत्र )

शिक्रापूर | आंबेगाव -शिरुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या जवळच्या कार्यकर्त्याचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. दशक्रिया विधीच्या शोकसभेत बोलताना माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बोलताना जुन्या आठवणींना उजाळा देत “माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राजाभाऊच्या कुटुंबाला कधीही अंतर देणार नाही”. अशी भावना व्यक्त केली.

आंबेगाव – शिरुर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ पदाधिकारी करंदी गावचे (ता. शिरुर) माजी ग्रामपंचायत सदस्य आणि चासकमान कालवा सल्लागार समितीचे सदस्य राजेंद्र उर्फ राजाभाऊ भगवंत ढोकले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. दिलीप वळसे पाटील यांच्या जवळचे सहकारी म्हणून त्यांची परीसरात ओळख होती. २००९ च्या लोकसभा निवडणुकी अगोदर शिरुर तालुक्यातील ३९ गावे आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडले गेले, त्यावेळी दिलीप वळसे पाटील यांच्या सातत्याने संपर्कात राहून ३९ गावच्या भागातील मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी राजाभाऊ ढोकले यांनी मोलाची भूमिका बजावली होती. तेव्हापासून दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली.

करंदी गावच्या राजकीय आणि विकासाच्या दृष्टीने अग्रेसर असलेल्या राजाभाऊ ढोकले यांनी वेळ नदीवर बंधारे उभारण्याच्या मागणीसाठी सातत्याने माझ्याकडे आणि अजितदादांकडे पाठपुरावा केला असल्याची आठवण यावेळी बोलताना वळसे पाटील यांनी करून दिली. कौटुंबिक संबंधांची आठवण करून देताना वळसे पाटील पुढे म्हणाले की, मुलगा प्रविण यांना पक्षाच्या युवक संघटनेची जबाबदारी देण्यासाठी राजाभाऊंनी माझ्याकडे निरोप पाठवला राजाभाऊंचा निरोप म्हणजे तो माझ्यासाठी आदेशच होता आणि त्यानंतर प्रविण यांना शिरुर – आंबेगाव विधानसभा क्षेत्राच्या युवक अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.

दरम्यान राजाभाऊच्या कुटुंबातील बंटी ढोकले सामाजिक क्षेत्रात उत्तम प्रकारे काम करत आहे. राजाभाऊ ढोकले यांनी वयक्तिक लाभाचे आजपर्यंत कोणतेही काम मागितले नाही. राजाभाऊच्या आठवणी कधीही मनातून जाणार नाही, “माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी कधीही राजाभाऊंच्या कुटुंबाला अंतर देणार नाही, मला कधीही अर्ध्यारात्री साद घाला मी कधीही कुटुंबासाठी उभा राहील”, अशा प्रकारची भावना व्यक्त करताना दिलीप वळसे पाटील कार्यकर्त्याच्या आठवणीने भावुक झालेले पाहायला मिळाले.

error: Copying content is not allowed!!!