न्हावरे | शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत कारखाना बंद पडल्याने सभासदांनी संचालक मंडळाला धारेवर धरले. यावेळी संचालक मंडळ आणि सभासदांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याने सभासदांमध्ये नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर सभासदांनी संचालक मंडळाला विविध प्रश्न विचारत रोष व्यक्त केला. दरम्यान, सभेवेळी माजी आमदार अशोक पवार यांचे चिरंजीव आणि कारखान्याचे चेअरमन ऋषीराज पवार यांनी सभासदांचा ‘समाजकंटक’ असा उल्लेख केल्याचा आरोप करत सभासदांनी आक्रमक भूमिका घेतली. या वक्तव्यामुळे सभेत एकच गोंधळ उडाला आणि सभेचे कामकाज ठप्प झाले.
सभासदांनी चेअरमन ऋषीराज पवार यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली. सभासद या मागणीवर सभासद ठाम राहिले.
यावेळी संचालक विश्वास ढमढेरे यांनी चेअरमन यांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र, सभासदांनी त्यावर समाधान न मानता चेअरमन यांनीच माफी मागावी, अशी भूमिका घेतली.
त्यानंतर माजी आमदार अशोक पवार, चेअरमन ऋषीराज पवार आणि संचालक मंडळाने सभेचे कामकाज पुढे न सुरू करता राष्ट्रगीताला सुरुवात केली. राष्ट्रगीतानंतर सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले.
सभासदांच्या प्रश्नांवरून सुरू झालेला वाद आणि ‘समाजकंटक’ या शब्दाच्या वापरामुळे घोडगंगा कारखान्याची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली.
सभा संपल्यानंतर दादा पाटील फराटे, श्रीनिवास घाडगे, सुधीर फराटे, काकासाहेब खळदकर, आबासाहेब गव्हाणे, शशिकांत दासगुडे, स्वप्नील ढमढेरे, स्वप्नील गायकवाड, राजेंद्र जासूद, वीरेंद्र शेलार, राहुल गवारे, सचिन मचाले यांनी एकत्र येत प्रतिसभा घेतली या सभेत माजी आमदार अशोक पवार, चेअरमन ऋषीराज पवार यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी बोलताना दादा पाटील फराटे यांनी सांगितले की, प्रश्न विचारणाऱ्याला हे पितापुत्र समाजकंटक म्हणतात, हा कारखाना चालू करण्याची मानसिकता पितापुत्राची नसल्याचेही फराटे नमूद केले.











Add Comment