आंबेगाव खेड जुन्नर ताज्या घडामोडी पुणे महाराष्ट्र राजकीय शिरूर हवेली

आढळराव पाटील राष्ट्रवादीत गेले,मात्र शिंदे शिवसेनेतच राहिले आणि जिल्हा प्रमुख झाले.

शिरूर / पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेले लोकसभा निवडणूक लढले मात्र पराभूत झाले. परंतु शिरुर तालुक्यातील आढळराव पाटील यांचे अनेक समर्थक शिवसेनेतच राहिले. त्यातील एक नाव म्हणजे शिवसेनेचा युवा चेहरा असलेले बापूसाहेब शिंदे. एकनाथ शिंदे यांनी बक्षिस म्हणून बापूसाहेब शिंदे यांना थेट जिल्ह्याची जबाबदारी दिली.

शिवसेना पक्षाने पुणे जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील शिवसेनेचे जुने पदाधिकारी बापूसाहेब शिंदे यांची पुणे जिल्हा शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावर, तर तृप्तीताई सरोदे यांची शिवसेना महिला आघाडीच्या पुणे जिल्हा जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही नियुक्त्यांचे शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांकडून उत्स्फूर्त स्वागत होत असून, सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

बापूसाहेब शिंदे हे मूळचे रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील असून, त्यांनी पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. यापूर्वी त्यांनी युवासेना पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना युवकांना पक्षाशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क आणि जनसामान्यांमध्ये असलेली लोकप्रियता यामुळे त्यांची जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याचे बोलले जात आहे.

बापूसाहेब शिंदे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मात्र, त्यांची खरी ओळख केवळ राजकीय कार्यकर्ते म्हणून नसून ‘आरोग्यदूत’ म्हणूनही आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदतीची गरज असलेल्या असंख्य रुग्णांना त्यांनी पुणे जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील नागरिकांनाही मदत मिळवून दिली आहे. अनेक गरजू कुटुंबांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देत त्यांनी सामाजिक क्षेत्रातही वेगळा ठसा उमटवला आहे.

दुसरीकडे, तृप्तीताई सरोदे यांनीही आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर पक्षात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत असताना त्यांनी शिरूर पंचक्रोशीत सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविले. त्यानंतर शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या कार्यशैलीमुळे पक्षात त्यांचे वेगळे स्थान निर्माण झाले असून, त्याच कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर पुणे जिल्हा महिला आघाडी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविल्याचे मानले जात आहे.

या दोन्ही नियुक्त्यांमुळे पुणे जिल्ह्यात शिवसेना संघटना अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह पक्ष विस्ताराच्या दृष्टीने या नियुक्त्या महत्त्वपूर्ण मानल्या जात असून, बापूसाहेब शिंदे आणि तृप्तीताई सरोदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

error: Copying content is not allowed!!!