शिरूर | राजकारणात प्रत्येक विजय मतपेटीतूनच मिळतो असे नाही; काही विजय विश्वास, सातत्य आणि संघटनात्मक कामातूनही मिळतात. शिरूर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला शुभम नवले यांच्या बाबतीत हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला, मात्र त्याच पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने त्यांच्यावर थेट युवती प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवत मोठा विश्वास व्यक्त केला आहे. या नियुक्तीनंतर शिरूर तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या नियुक्तीची जोरदार चर्चा रंगली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निर्मला नवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून शिरूर पंचायत समितीची निवडणूक लढवली होती. मात्र मतदारांनी त्यांना विजयाची साथ दिली नाही. सोशल मीडियावर लाखो चाहत्यांचा पाठिंबा असला तरी तो मतांमध्ये रूपांतरित झाला नाही. परंतु निवडणुकीतील पराभव असूनही पक्ष नेतृत्वाने त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना राज्यभरातील युवती संघटना मजबूत करण्याची जबाबदारी दिली. त्यामुळे “पराभव हा शेवट नसतो, तर नव्या सुरुवातीचा मार्ग असतो,” हे त्यांच्या प्रवासातून अधोरेखित झाले आहे.
२०२१ मध्ये कारेगावच्या सरपंचपदाची धुरा स्वीकारल्यानंतर निर्मला नवले यांनी गावात विविध विकासकामे, महिला सक्षमीकरण, ग्रामस्वच्छता, युवकांसाठी उपक्रम आणि पायाभूत सुविधांवर भर दिला. लोकाभिमुख कामामुळे त्यांनी स्थानिक पातळीवर स्वतंत्र नेतृत्व निर्माण केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी संघटनात्मक कामात सक्रिय भूमिका बजावली. ग्रामीण भागातील महिलांना पक्षाशी जोडणे, कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवणे आणि पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचवणे या कामांमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली.
राजकीय वर्तुळात निर्मला नवले यांचे खासदार पार्थ पवार तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे बोलले जाते. पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभागही सातत्याने दिसून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघटनात्मक पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला जात असताना, निर्मला नवले यांच्यावर युवती प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये पक्षाचा विस्तार, नव्या नेतृत्वाला संधी आणि बूथस्तरापर्यंत संघटना मजबूत करण्याचे मोठे आव्हान आता त्यांच्या खांद्यावर असेल.
निर्मला नवले या सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय चेहरा आहेत. फेसबुक, इन्स्टाग्रामसह विविध डिजिटल माध्यमांवर त्यांचे मोठे फॉलोअर्स आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीने दिलेल्या महागड्या गाडीच्या गिफ्टचा व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्या प्रत्येक पोस्ट आणि व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळत राहिला. मात्र आता त्यांच्यासमोर सोशल मीडियावरील लोकप्रियतेपेक्षा राज्यभरातील युवती संघटना उभी करण्याचे मोठे आव्हान आहे. डिजिटल लोकप्रियता आणि प्रत्यक्ष संघटनात्मक काम यांचा समतोल राखत त्या पक्षाला कितपत बळकटी देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिरूर तालुक्यातील एका गावाच्या माजी सरपंचाला थेट राज्यस्तरीय नेतृत्वाची संधी मिळणे ही तालुक्याच्या राजकारणासाठीही महत्त्वाची बाब मानली जात आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, राज्याच्या राजकारणात शिरूरचा आवाज अधिक प्रभावीपणे पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











Add Comment