शिक्रापूर | पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात मृतदेहाच्या खुनाचा शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत उलगडा केला आहे. शेतातील विजपंप चोरी केल्याचा संशय आणि आरोपीच्या बहिणीला त्रास देणाऱ्या व्यक्तीला मृत व्यक्ती मदत करत असल्याच्या रागातून हा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींनी फुटलेल्या बिअरच्या बाटलीने गळ्यावर वार करून हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तलावात फेकून दिला.
दि. १७ जुलै रोजी पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील पाझर तलावात एका २५ ते ३० वर्षीय अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पिंपळे जगतापच्या पोलीस पाटील वर्षा योगेश थिटे यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मृतदेह बराच काळ पाण्यात असल्याने ओळख पटविणे अवघड झाले होते. त्यानंतर पोलिसांनी मृताचे फोटो, कपड्यांचे वर्णन आणि इतर माहिती सोशल मीडियावर प्रसारित केली. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहितीच्या आधारे मृताची ओळख टूटूकुमार अजित यादव (वय २२, रा. जहानाबाद, बिहार) अशी पटली.
तपासादरम्यान पोलिसांनी पुसकरकुमार अरुण यादव (२०), आयुषमान सुशील पांडे (२०) आणि सचिन मारुती हिंगेवार (२०) या तिघांना शिक्रापूर येथून ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
तपासात आरोपी पुसकरकुमार यादव याला त्याच्या बिहार येथील मूळगावी शेतातील विजपंप (मोटार) चोरी केल्याचा संशय मृतावर होता. तसेच आरोपीच्या बहिणीला त्रास देणाऱ्या व्यक्तीला मृत मदत करत असल्याचा रागही त्याच्या मनात होता. या दोन्ही कारणांमुळे आरोपींनी संगनमत करून मृताला दारू पिण्याच्या बहाण्याने पिंपळे जगताप येथील पाझर तलावाजवळ नेले दारू पाजून गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला परंतु प्रयत्न यशस्वी होत नसल्याने गळ्यावर फुटलेल्या बिअरच्या बाटलीने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. त्यानंतर ओळख पटू नये आणि पुरावा नष्ट व्हावा म्हणून बियर फुटलेली बाटली, इतर साहित्य घेऊन पळून गेले व मृतदेह पिंपळे जगताप येथील पाझर तलावात फेकून दिला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि शिक्रापूर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सपोनि शिवाजी मोरसले, सपोनि कृष्णातात गिरी, पोउपनि उमाकांत कुंजीर, पोउपनि सोमनाथ कचरे व नितीन सुद्रीक अमोल दांडगे, शिवाजी चितारे, रोहित परखे, अमोल नलगे, नवनाथ जायभये, मिलिंद देवरे, चंद्रकांत काळे, संदीप कारंडे, पोहा लक्ष्मण शिरसकर, महेंद्र निचित, राम जाधव, नारायण वाळके व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रा. येथील पोसई महेश डोंगरे, पोसई तुषार पंदारे, जनार्धन शेळके, संजू जाधव, राजू मोनानी, विकास पाटील यांनी अवघ्या तीन दिवसांत गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल तपास पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.











Add Comment