रांजणगाव, ता. १९ जुलै : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील नामांकित कंपनीच्या आवारात मालवाहतूक करत असताना झालेल्या भीषण अपघातात आयशर टेम्पो चालक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची नोंद रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, या दुर्घटनेमुळे कंपनीतील सुरक्षितता व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक हे कंपनीच्या डॉकसमोर टेम्पोमध्ये माल भरल्यानंतर मागील पडदा बांधत असताना टेम्पो आणि रॅम्प यांच्या मध्ये अडकले. त्यांना तातडीने शिरूर येथील माणिकचंद धारिवाल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्घटनेनंतर औद्योगिक सुरक्षा व्यवस्थेवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. माल चढ-उताराच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना होत्या का? रॅम्प परिसरात सुरक्षित कार्यपद्धतीचे पालन केले जात होते का? कामगार व वाहनचालकांसाठी आवश्यक सुरक्षा प्रशिक्षण, देखरेख आणि अपघात प्रतिबंधक यंत्रणा कार्यरत होती का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता तपासातून समोर येणे अपेक्षित आहे. औद्योगिक क्षेत्रात उत्पादनाइतकीच कामगार आणि वाहनचालकांची सुरक्षितता महत्त्वाची मानली जाते. अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक कंपनीने सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे, धोकादायक ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था उभारणे आणि नियमित सुरक्षा ऑडिट करणे आवश्यक आहे. अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. तपासातून अपघाताचे नेमके कारण, जबाबदारी आणि सुरक्षिततेतील त्रुटी स्पष्ट होणार आहेत. दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
“एका कुटुंबाचा आधार हिरावून घेणाऱ्या या दुर्घटनेत नेमकी चूक कुणाची? औद्योगिक सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाले का? या प्रश्नांची निष्पक्ष आणि सखोल चौकशी होणे हीच काळाची गरज आहे.”











Add Comment