शिक्रापूर | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तरुण नवलाख उंबरे (ता. खेड) येथे राहायचा प्रवाशी वाहतूक करणारी कार भाड्याने घ्यायचा आणि रात्री शेतकऱ्यांच्या गोठ्यात जाऊन शेळ्या चोरायचा त्या शेळ्या कारमध्ये नेऊन बाजारात विकायचा. असा त्याचा नित्याचा प्रकार सुरू होता. अनेक शेतकऱ्यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली परंतु चोर काही सापडेना. शेवटी पोलिसांनी चोर शोधण्याचा चंग बांधला आणि भोईटी उर्फ कृष्णा कांतीलाल काळे हा सराईत चोर अलगद पोलिसांच्या सापळ्यात अडकला.
शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये जातेगाव (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याने रात्री गोठ्यातून शेळी चोरी गेल्याची तक्रार दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस हवालदार विकास पाटील आणि पोलिस अंमलदार सागर धुमाळ यांनी तपासला सुरुवात केली. अशाच प्रकारचे शिरूर पोलिस स्टेशनमध्ये देखील गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आल्यानंतर विकास पाटील आणि सागर धुमाळ या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी तपासला गती दिली. जातेगाव (ता. शिरुर) येथील शेतकऱ्याची चोरी गेलेल्या शेळीचा तपास करताना एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार त्या परिसरात सीसीटीव्ही मध्ये आढळून आली.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पांढऱ्या रंगाच्या स्वीप्ट कारचा पाठलाग करताना त्या कारवर पुढच्या बाजूच्या काचेवर ‘रायबा’ असे नाव असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ‘रायबा’ टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचा शोध घेतला ही टुरिस्टसाठी कार पुरवणारी एजन्सी खेड तालुक्यातील नवलाख उंबरे परिसरात असल्याचे तांत्रिक तपासात पोळसांना आढळून आले. पोलिसांनी नवलाख उंबरे परिसरात आपला मोर्चा वळवला. त्या भागात तपास करताना तीच गाडी पोलिसांच्या नजरेस पडली. गाडीच्या मालकाकडे पोलिसांनी चौकशी केली असता ही कार गाडी भोईटी उर्फ कृष्णा कांतीलाल काळे नामक युवकाने भाड्याने नेली होती अशी माहिती मिळाली. पोलिसांनी गाडीची कसून चौकशी केली गाडीत शेळीचे केस आणि उग्र वास आल्याने पोलिसांची खात्री पटली की याच गाडीत शेळी नेल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचा तपास करताना आरोपी हा गावी निघून गेल्याने पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्याच्या दिघी काळेगाव या गावात जाऊन चौकशी केली असता हा आरोपी याच गावचा असून तो फरार असल्याचे पोलिसांना समजले.
पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला नवलाख उंबरे ( ता. खेड ) परिसरातून ताब्यात घेतले त्याला पोलिसी खाकी दाखवल्यानंतर एकूण १३ शेळ्या शिरुर तालुक्यात चोरी केल्या असल्याचे त्याने काबुल केले. चोरी केलेल्या शेळ्या बाजारात विकल्या असल्याने कोणत्या व्यापाऱ्यांना या शेळ्या विकल्या याचा तपास आता पोलिस करत आहेत. एक शेळी, कार गाडी आणि आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विकास पाटील आणि सागर धुमाळ या पोलिस कर्मचाऱ्यांनी आरोपीचा छडा लावला आहे. पोलिस अधीक्षक संदीपसिग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहा पो फौज संजय पड्याळ, पो हवा तुषार पंदारे, पो हवा जनार्दन शेळके, पो हवा संजू जाधव, पो हवा राजू मोमीन, पो हवा विकास पाटील, पो अंमलदार सागर धुमाळ हा तपास केला आहे. आणखी पुढील तपास पोलिस करत आहेत. आरोपीने आणखी कुठे कुठे शेळ्या चोरी केल्या आहेत का ? याची माहिती पोलीस घेत आहेत.











Add Comment