ताज्या घडामोडी राजकीय शिरूर

जमीन गैरव्यवहार प्रकरणी बांदलसह संदीप भोंडवे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यासह संदीप भोंडवे, सचिन पलांडे यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांदल याने एका शेतकर्‍याला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जबरदस्तीने जमिनीचे गहाण खत करुन घेतले व परस्पर ६ कोटी ७५ लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये शिवाजीराव भोसले बँकेतील एका अधिकार्‍याचा सहभाग आहे.

याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी मंगलदास बांदलसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. संदीप भोंडवे, विकास भोंडवे, सचिन पलांडे आणि शिवाजीराव भोसले बँकेतील एक अधिकारी अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी फिर्यादी गंगाराम सावळा मासाळकर (वय ७४, रा. वढु खुर्द, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार वढु खुर्द येथे २०१३ मध्ये व त्यानंतर वेळोवेळी घडला असल्याचे नमूद केले आहे.

फिर्यादी यांची हवेली तालुक्यात ३ हेक्टर ७१ आर जमीन आहे. बांदल व इतरांनी फिर्यादी यांना चारचाकी गाडीमध्ये डांबून ठेवून दमदाटी करुन व रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जबरदस्तीने जमिनीचे गहाण खत करुन घेतले. त्याचबरोबर त्यांच्या परस्पर ६ कोटी ७५ लाख रुपये काढून घेतले. या जमिनीवरील बोझा कमी करण्यासाठी त्यांनी एक कोटी रुपयांची मागणी केली. त्याचे राजकीय लांगेबांधे असल्याचे फिर्यादी यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दिल्यास ते फिर्यादीच्या कुटुंबियांना त्रास देतील म्हणून त्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दिली नव्हती. त्यांनी अद्यापर्यंत फिर्यादीचे जमिनीवरील बोझा कमी केला नाही. त्यामुळे बांदल यांच्यावर आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

पुण्यातील सराफ व्यावसायिकाला ५० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मंगलदास बांदल यांना पुणे पोलिसांनी मार्च २०२० मध्ये अटक केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे़

शिक्रापूर पोलीस ठाण्यात मंगलदास बांदल याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. शिक्रापूर येथील दत्तात्रय मांढरे यांच्या फिर्यादीवरुन बांदल यांना शिक्रापूर पोलिसांनी २६ मे रोजी अटक केली होती. त्यानंतर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेने त्याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असताना रवींद्र सातपुते यांची फिर्याद दाखल झाली होती. दरम्यान मंगलदास बांदल सद्या न्यायालयीन कोठडीत आहे.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!