आंबेगाव ताज्या घडामोडी राजकीय

आंबेगाव तालुका प्रशासन राजकीय दबावाला बळी पडतय ? – शिवसेनेचा सवाल

मंचर, पुणे | राज्यात तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले खरे मात्र स्थानिक पातळीवर एकमेकांचे विरोधक असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सातत्याने राजकीय वाद पहायला मिळतात त्यात शिरूर लोकसभा मतदार संघात याचे प्रमाण अधिकच आहे.

कोरोना विषाणूची तिसरी लाट उंबरठ्यावर पोहचली असताना आंबेगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी सतर्क झाले. आणि जिल्हा प्रशासनाकडे बंद असलेले शिवनेरी जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील तत्काळ दखल घेऊन शिवनेरी जम्बो कोविड सेंटर आणि अवसरी कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले. परंतु उपजिल्हाधिकारी मंचर यांनी मनुष्यबळ पुरेसे नसल्याचे कारण देत शिवनेरी जम्बो कोविड सेंटर आणि अवसरी कोविड केअर सेंटर सुरू करण्यास असमर्थता दाखविली. त्यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा वाद उफाळून आला आहे.

तब्बल २४ कोटी रुपये खर्च करून कुठलीही इमारत बांधली नाही, केवळ संसाधनासाठी एवढे पैसे खर्च केले, अवघे तीन महिने हे सेंटर चालवलं आणि या शिवनेरी जम्बो कोविड सेंटरचा राज्यभर डंका पिटवला शिरूर, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील रुग्णांसाठी हे सेंटर उभे करण्यात आले, या चारही तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे, तिसरी लाट येऊ घातली आहे, मात्र हे २४ कोटी रुपये खर्च करूनही त्याचा उपयोग जर सामान्य जनतेला होणार नसेल तर हे उभं केलं कशासाठी असा सवाल आंबेगाव शिवसेना तालुकाप्रमुख अरुण गिरे यांनी उपस्थित केला आहे.

सप्टेंबर महिन्यापासून हे सेंटर बंद आहे चारही तालुक्यातील भागामध्ये कुठे, ना कुठे कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यांना उपचारासाठी शहरी भागात न्यावं लागत आहे. सामान्य नागरिकांना याची मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागत आहे. हे ओळखून शिवसेनेच्या वतीने शिवनेरी जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी केली आणि ते सुरू करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. याचं श्रेय शिवसेनेला जायला नको म्हणून कोणाच्या तरी पोटात दुखलं म्हणून तालुका प्रशासनावर राजकीय दबाव निर्माण केला. आणि सेंटर सुरू न करण्याचा घाट घातला की काय ? असा सवाल आमच्या मनात उपस्थितत होतोय असे मत अरुण गिरे यांनी व्यक्त केले. एकंदरीत गिरे यांच्या बोलण्याचा रोख राष्ट्रवादीच्या नेत्यांवर होता. त्यामुळे आंबेगाव तालुका शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा श्रेयवादाची लढाई पहायला मिळत आहे.

मात्र या साठमारीत सर्वसामान्य जनतेला झळ सोसावी लागत आहे. एवढे पैसे खर्च करून आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही शिवनेरी जम्बो कोविड सेंटर कोरोना बधितांच्या सेवेत उपयोगी येणार नसेल तर प्रशासन आणि राजकीय पुढाऱ्यांची उदासीनता यातून स्पष्टपणे दिसून येते असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

error: Copying content is not allowed!!!