राजकीय शिरूर

देवाच्या आडून मतांचा बाजार, देवदर्शन उघडणार का ग्रामपंचायतचं दार..?

शिक्रापूर | निवडणूक डोळ्यासमोर ठेवत अनेक क्लुप्त्या करून मतदारांना आकर्षित करण्याचे अनेक नवनवीन फंडे इच्छूक उमेदवार वापरात असतात. त्यात सर्वात प्रभावी फंडा म्हणजे ‘देवदर्शन यात्रा’ असा समज आता अनेकांचा झाला आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत हा ‘देवदर्शन यात्रेचा’ फंडा अनेकांचा यशस्वी झाला तर अनेकांची निराशा देखील झालेली पाहायला मिळाली. 

खरं तर निवडणुकीला सामोरे जाताना इच्छुक उमेदवारांनी विकासाच्या मुद्यांवर सामोरे जायला हवं, मात्र अलीकडच्या काळात जो उमेदवार खर्चिक निवडणूक करेल त्याचा विजय होईल असा अंदाज बांधला जातो. परंतु सामान्य कार्यकर्त्यांना निवडणुकीत होणाऱ्या अर्थकारणामुळे या निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडावं लागतं.  परंतु अशा प्रकारे देवाच्या नावाच्या आडून मतांचा बाजार करणे हे कितपत योग्य आहे हा एक संशोधनाचा विषय लोकशाहीमध्ये बनला आहे. 

दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीनंतर अगदी काही दिवसांतच ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतच्या इच्छुक उमेदवारांनी देखील मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘देवदर्शन यात्रेचे’ आयोजन केले आहे. मतदारांना देवाच्या आडून भावनिक करायचं आणि आपल्याला मत देण्यास भाग पडायचं हा नवीन फंडा लोकप्रिय होत असताना, मात्र मतदारांना देखील मत पेटीजवळ गेल्यानंतर देवदर्शन यात्रेची आठवण करून देण्यासाठी मतदान केंद्राचा आसपास ज्या देवाच्या दर्शनाला नेले त्याच देवाचा फोटो मोठा बॅनर स्वरूपात लावायचा आणि देवाची भीती निर्माण करायची व मत मिळवायचं अशा प्रकारे लोकशाहीच्या राज्यात मतांचा बाजार मांडला गेला आहे. 

विधानसभा निवडणुकीत देखील हाच प्रकार पाहायला मिळाला तर जिल्हा परिषद निवडणूकित याचा कळस गाठला गेला हे कमी म्हणून की काय म्हणून आता ग्रामपंचायत निवडणुकीतही हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. अनेक जाणकारांचा अनुभव आहे की, देवदर्शन यात्रा केलेल्या अनेक उमेदवारांनी निवडून आल्यानंतर मतदारसंघात पाठ फिरवली तसाच प्रकार पुढे पाहायला मिळेल का ? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

मतदारांनी देखील यातून बोध घेण्याची गरज आहे, जेव्हा जेव्हा देवदर्शन यात्रा आयोजित केली आहे, तेव्हा तेव्हा आपलं अमूल्य मत विकले गेले आहे किंवा भावनेच्या बाजारात मांडले गेले आहे. आपले मत सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही आपली आहे. मत पेटीवर समोर गेल्यानंतर आपले मत हे आपला अधिकार असला पाहिजे. खरं तर निवडणूक आयोगाने देखील निवडणूक आचारसंहिता त्याचबरोबर अशा प्रकारच्या घटनांची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.

error: Copying content is not allowed!!!