ताज्या घडामोडी प महाराष्ट्र पुणे महाराष्ट्र राजकीय

सत्तेत असूनही भाजप, राष्ट्रवादीचे अपयश. ग्रा. प. सदस्यांची नाराजी, शिरूर बाजार समिती निवडणूक..!

शिरूर | नुकतीच शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तब्बल ९ वर्षानंतर जाहीर झाली आहे. ग्रामपंचायत मतदारसंघात एकूण ९६ ग्रामपंचायतच्या सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळणे अपेक्षित होते. परंतु शासनाच्या कारभारामुळे ७८ ग्रामपंचायत मधील एकूण ७२९ सदस्यांना अर्थात मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागणार आहे.

ग्रामपंचायत सदस्य पदाचा कार्यकाळ संपल्यामुळे या सदस्यांना आता बाजार समितीच्या निवडणुकीपासून वंचित रहावे लागणार आहे. मुळात शिरुर तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांचे वर्चस्व आहे आणि हे दोन्ही पक्ष राज्य सरकारमध्ये सत्तेत आहेत. वास्तविक पाहता या पक्षाच्या नेत्यांवर ग्रामपंचायत सदस्यांची तीव्र नाराजी पहायला मिळते.

माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघातच अशी ही तांत्रिक बाब निर्माण झाली आहे. त्यातच निवडणूक जाहीर झाल्यानंतर माजी आमदार अशोक पवार यांनी न्यायालयाकडे धाव घेतली आहे. भाजपने मात्र सावध पवित्रा घेत, आहे त्या परिस्थितीत निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका घेतली आहे.

तालुक्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत सदस्यांना मतदानापासून वंचित राहायला लागणार असल्याने ग्रामपंचायत सदस्यांनी नेत्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी पाहता अशोक पवार यांनी घेतलेली भूमिका म्हणजे ‘उशिरा का होईना सुचले’ असल्याचे बोलले जात आहे. अर्थात अशोक पवार यांनी किमान वंचित ग्रामपंचायत सदस्यांना न्याय मिळावा यासाठी भूमिका तर घेतली असल्याने ग्रामपंचायत सदस्यांनी देखील त्यांच्या ‘सुरात सुर मिसळवला’ आहे.

या निवडणुकीच्या मतदानासाठी केवळ १८ ग्रामपंचायतचे सदस्य मतदानास पात्र ठरणार असल्याने इच्छुक उमेदवारांची गर्दी पाहायला मिळणार आहे. त्यातच निवडणूक म्हणलं की पैशांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. कमी मते असल्याने मताचा बाजारभाव यावेळी आश्चर्यचकित करणारा असणार आहे.

शिरूर तालुक्यातील राजकीय समीकरण पाहता शिरुरचे ४२ गावं ही आंबेगावच्या अर्थात दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात आहेत तर, बाकी शिरुरची ६० आणि हवेली ४० असा शिरुर – हवेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व हे हवेली तालुक्यातील ज्ञानेश्वर कटके करत आहेत. अर्थात या शिरूरच्या बाजार समितीच्या निवडणुकीची उमेदवारी मिळवताना इच्छुक उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. दिलीप वळसे पाटील आणि ज्ञानेश्वर कटके या दोन्ही नेत्यांची मर्जी इच्छुकांना सांभाळावी लागणार असल्याने इच्छुकांची दमछाक होणार एवढं मात्र नक्की.

ही कायदेशीर प्रक्रिया आहे, अशा प्रकारे अचानक निवडणूक लागेल याची आम्हाला कल्पना नव्हती तरी देखील शासन स्तरावर याबाबत काही करता येईल का, यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या कानावर ही परिस्थिती मी घातली आहे. – राजेंद्र कोरेकर ( जिल्हाध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस, पुणे)

मोठ्या प्रतीक्षेनंतर निवडणूक लागली आहे, आहे त्या परिस्थिला सामोरे जाऊन जेवढे मतदार आहे त्यांच्यासोबत चर्चा करून निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत. – शेखर पाचुंदकर ( भाजप नेते – शिरुर)

error: Copying content is not allowed!!!