शिरूरच्या जनतेप्रति वळसे पाटलांची भावनिक प्रतिक्रिया.
पाबळ | शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना दिलीप वळसे पाटील यांनी प्रचारादरम्यान बोलताना शिरुर तालुक्याच्या जनतेने भरभरून दिले असल्याचे सांगितले त्यामुळे यापुढे माझ्या शरीरात प्राण असे पर्यंत शिरुर तालुक्याला कधीही विसरणार नाही अशी भावनिक प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर यांनी बोलताना दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले ते म्हणाले की, ‘२००९ साली शिरुर तालुक्याचे विभाजन झाले ४० गावं ही आंबेगाव मतदार संघाला जोडले गेले आणि या ४० गावाचं भाग्य उजळले. करोडो रुपयांचा विकास निधी मिळाला. राज्याच्या राजकारणात वजन असलेले नेतृत्व या भागाला मिळाले आणि विकासाची कामे मार्गी लागली’. पोपटराव गावडे यांनी देखील सांगितले की, दिलीप वळसे पाटील साहेबांच्या मतदारसंघाला जोडले गेल्यानंतर राजकारणातील आमचा संघर्ष कमी झाला. आमचा भाग विकसित झाला.
मंगलदास बांदल यांनी देखील वळसे पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक करत सहकारी संस्थांच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यातील राजकीय साक्षरता आणि शेतकऱ्यांचा विकास कसा होत गेला यावर प्रकाश टाकला. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी देखील दिलीप वळसे पाटील यांचं राजकारण मी महाविद्यालयीन काळापासून पाहत आलोय. भिमाशंकर सहकारी साखर कारखाना उत्तम प्रकारे चालवला आणि त्यामुळे शिरुरच्या ४२ गावांचा ऊस योग्य दराने गाळप झाला त्याचा फायदा शिरुर तालुक्याच्या विकासाला झाला. त्यामुळे वळसे पाटील साहेबांचे नेतृत्व शिरुर तालुक्याला महत्वाचे ठरले.
दरम्यान यावर बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थितांची मने जिंकत शिरुरच्या ४२ गावांनी आणि संपूर्ण शिरुर तालुक्याने मला भरभरून दिले आहे. त्यामुळे शिरूरच्या बाजार समितीच्या कारभाराकडे बारकाईने लक्ष देणार असल्याचे नमूद केले. दरम्यान ते म्हणाले ‘जो कोणी म्हणत असेल की पुढे मतदारसंघ बदल होणार आहे, ४२ गावं आमच्या मतदारसंघाला जोडले जाणार आहे तर मी आजच सांगतो जोपर्यंत माझ्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत शिरुर तालुक्याला कधीही विसरणार नाही.’ यावेळी शिरुर तालुक्यातील जनतेबद्दल भावनिक नाते असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी नमूद केल्यानंतर वातावरणात एकच शांतता पाहायला मिळाली. दिलीप वळसे पाटील यांनी या वक्तव्यामुळे उपस्थितांची मने जिंकली.











Add Comment