आंबेगाव ताज्या घडामोडी राजकीय शिरूर

निवडणूक बाजार समितीची मात्र मुद्दा कारखान्याचा..!

शिरुर बाजार समितीचा राजकीय आखाडा तापला.

शिरुर | घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडल्यानंतर शिरुर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी माजी आमदार अशोक पवार यांच्यावर नाराजी व्यक्त करत विधानसभा निवडणुकीत पराभूत केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकितीही केवळ पत्नी सुजाता पवार यांच्याच उमेदवारीवर समाधान मानावे लागले. त्याचबरोबर आता शिरुर कृषी बाजार समितीच्या निवडणूकीचा राजकीय आखाडा तापला आहे. एकमेकांवर आरोप केले जात आहेत.

माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, आमदार माऊली कटके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा पॅनेल बाजार समितीच्या निवडणुकीत एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार अशोक पवार यांनी पॅनेल उभा केला आहे तर त्यांच्या पॅनेलला उमेदवारी माघारी घेण्याच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडीनंतर राहुल पाचर्णे, जयश्री पलांडे यांनी पाठिंबा देत प्रचारात सहभागी झाले आहेत.

मतदानाला अवघे तीन दिवस उरले असताना माजी आमदार अशोक पवार आणि आमदार माऊली कटके यांच्यात चांगलीच जुंपली आहे. एकमेकांच्या विरोधात आरोप करत निवडणूकीचे वातावरण तापले आहे. चासकमानच्या पाणी नियोजनावर आमदार माऊली कटके यांना पवार यांनी घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशोक पवार यांच्यावर सहकारी कारखाना मोडीत काढून खाजगी कारखाना मात्र उत्तम कसा चालवता ? या प्रश्नावर घेरले आहे.

दरम्यान माजी आमदार पोपटराव गावडे यांनी अशोक पवार यांच्या कार्यपद्धतीचा समाचार घेत एका बाजूला आंबेगाव तालुक्यातील सहकारी संस्था, बाजार समिती, खरेदीविक्री संघ, भिमाशंकर साखर कारखाना उत्तमरीत्या चालवणारे दिलीप वळसे पाटील आहेत तर दुसऱ्या बाजूला स्वतःचा खाजगी कारखाना दिवसेंदिवस वाढतवत सहकारी साखर कारखाना मोडून खाणारे अशोक पवार आहेत याच मुद्यावर मतदारांनी विचार करण्याची गरज असल्याचे गावडे यांनी सांगितले.

घोडगंगा साखर कारखान्याची निवडणुक आणि पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूकीची आठवण करून देत दिलीप वळसे पाटील यांनी देखील अशोक पवार यांना अप्रत्यक्ष लक्ष केले आहे. घोडगंगा साखर करखाण्याच्या निवडणुकीत पूर्व भागातून अर्थात अशोक पवार यांच्या मतदारसंघातच अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनेलची पीछेहाट झाली होती, मात्र वळसे पाटील यांनी ४२ गावांत स्वतः गावोगावी फिरून मतदान मिळवण्याच्या दृष्टीने पाऊले टाकली आणि ४२ गावांतील मतावर अशोक पवार यांचे पॅनेल कारखान्याच्या निवडणुकीत विजयी झाले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही ५२ पैकी ५० मते अशोक पवारांना दिली. त्यामुळे सहकार क्षेत्रातील निवडणूकित अशोक पवार यांना ४२ गावांनीच तारले असल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळाले आहे.

यावेळी मात्र खुद्द दिलीप वळसे पाटील यांनी शिरुर बाजार समितीच्या निवडणुकीत स्वतः लक्ष घातले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अशोक पवार यांच्या पॅनेलला ही निवडणूक जड जाणार असल्याचे बोलले जात आहे.

क्रमशः

Featured

error: Copying content is not allowed!!!