शिरुर बाजार समिती निवडणूक.
शिरुर | नुकतीच विधानपरिषदेची निवडणूक जाहीर झाली, उमेदवारी अर्ज देखील दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये पुणेची जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेली. पार्थ पवार यांनी जुन्या इच्छुक उमेदवारांना डावलून नवीन पक्षात प्रवेश केलेल्या मित्राला अर्थात भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांच्या मुलाला विक्रम काकडे यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली. दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर कार्यकर्त्यांचा नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.
तर शिरुर तालुक्यात देखील बाजार समितीच्या निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची नुकतीच आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली तर भाजपची देखील रांजणगाव गणपती याठिकाणी शिरुर बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली आहे. तर दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) पक्षाची देखील बैठक झाली.
माजी आमदार अशोक पवार यांनी देखील शिरुर बाजार समितीच्या निवडणूकित करिष्मा दाखवून देण्याचे संकेत दिले आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अनेक मातब्बर नेत्यांची फौज आहे तर, भाजपने देखील या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. तब्बल ९ वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिरुरच्या सहकारातील निवडणुकांचा अनुभव असलेल्या अनेक नेत्यांनी या निवडणुकीत आपल्या पुत्राला, पुतण्याला किंवा पत्नीला उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
शिरूरच्या ४२ गावांतील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे तर, शिरुर -हवेली मतदारसंघातील नेत्यांनी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे आपल्या वारसदारांना या निवडणुकीत उतरवण्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. वास्तविक पाहता या निवडणुकीत नवीन चेहेरे अर्थात तरुणांना संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
विक्रम काकडे यांच्या उमेदवारीनंतर पक्षात अगोदरच कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे, त्यात शिरुरच्या बाजार समिती निवडणुकीत देखील नेत्यांच्याच वारसदारांना उमेदवारी देण्यात आल्या तर याचा फायदा विरोधी पॅनेलला होऊ शकतो. राष्ट्रवादीला शह देण्यासाठी माजी आमदार अशोक पवार यांचा गट आणि दुसरीकडे भाजपची रणनीती अशा दुहेरी राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नुकतीच जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक पार पडली या निवडणुकीत माघार घ्यावी लागलेल्या किंवा संधी न मिळालेल्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीत संधी देण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असणार आहे.











Add Comment