Uncategorized आंबेगाव राजकीय शिरूर संपादकीय

नेत्यावर हल्ला, कार्यकर्त्यांचं मौन, वळसे पाटील संतापले..!

वाचा सविस्तर…

मंचर | आंबेगाव तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने दूध भेसळ प्रकरणी कारवाई केल्यानंतर आरोपी हे दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय आहेत आणि त्या आरोपींना वळसे पाटील पाठीशी घालतात. सभागृहात दिलीप वळसे पाटील याबद्दल काहीच बोलले नाही, त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. असा आरोप देवदत्त निकम यांनी केला. त्यानंतर दुधात भेसळ करणाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करत निकम यांनी तिथेही दिलीप वळसे पाटील यांच्यावर अनेक आरोप केले. सोशल मीडियावर देखील वळसे पाटील यांच्या विरोधात प्रचंड नाराजीचा सूर आवळला गेला. यावर दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन भूमिका स्पष्ट केली. या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांवर अक्षरशः संताप व्यक्त केला.

आपल्या पक्षावर, नेतृत्वातवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात, चिखलफेक केली जाते मात्र पदाधिकारी गप्प बसून आहेत. कोणतेही प्रतिउत्तर दिले जात नाही. अशा प्रकारची नाराजी दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली. ते बोलताना म्हणाले की, ‘सोशल मीडियावर फेक अकाउंट काढून बदनामी केली जाते, तुमच्यात धमक असेल तर तुमच्या अकाउंट वरून बदनामी करा, मग पुढे काय होतंय ते पहात रहा’. असा धमकीवजा इशारा दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांना दिला.

पुढे ते कार्यकर्त्यांना उद्देशुन म्हणाले की, ‘आमच्या पक्षाचे कार्यकर्ते काय करत आहेत ? पक्षावर, नेतृत्वावर चिखलफेक होत आहे, तुमच्यामध्ये एक सुध्दा माणूस नाही का ? सडेतोडपणे स्वतःच्या अकाउंट वरून उत्तर देऊ शकेल, तुमच्यात हिम्मत नसेल तर तुम्ही सांगा, आम्ही फक्त कामापूरतेच कार्यकर्ते आहोत, आम्ही बाकीच्या गोष्टी अंगावर घेणार नाही. चुकीच्या गोष्टीचे समर्थन करा असं मी म्हणणार नाही, सगळ्या कार्यकर्त्यांवर माझं लक्ष आहे, कोणाचं काय चाललंय हे मी बघत असतो. तुम्हाला पक्षावर होणारे हल्ले परतवून लावता आलेच पाहिजे’. अशी तंबी वळसे पाटील यांनी संताप व्यक्त करत कार्यकर्त्यांना दिली.

सोशल मीडियावर बहुतांश प्रतिक्रिया या दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधातच असतात. मात्र तिथेही समर्थक कधीही आरोप खोडताना पहायला मिळत नाही. किंवा वळसे पाटील यांच्या कामाची प्रशंसा करणारे कार्यकर्तेच उरले नाही की काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

दरम्यान मतदारसंघातील केंदूर येथील काही कुटुंबाच्या घरांचे नुकसान झाले शिरूरच्या ४२ गावचे कार्यकर्ते सरसावले नाही, मात्र आदिवासी भागातील कार्यकर्त्याने ही माहिती दिली. मग ४२ गावचे पदाधिकारी कुठे आहेत. असा सवाल दिलीप वळसे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे केला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माना खाली घातल्या.

या मेळाव्यात दिलीप वळसे पाटील यांनी केवळ विरोधकांचाच नव्हे तर स्वपक्षीय कार्यकर्त्यांचा देखील चांगलाच समाचार घेतला. मुळात यापूर्वी दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांवर बोलू नका, विरोधकांना प्रतिउत्तर देऊ नका आपण आपलं काम करा असाच सल्ला नेहमी दिला. यावेळी मात्र देवदत्त निकम यांनी केलेल्या अनेक आरोपांना वळसे पाटील यांनी गांभीर्याने घेतले. त्यांनी निकम यांचा नामोल्लेख टाळत त्यांचा चांगलाच समाचार घेतला.

या प्रकरणातून पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्याचबरोबर विशेषतः कुटुंबातील सदस्य नेमका काय बोध घेतात हे येणारा काळच ठरवेल. यापुढे दिलीप वळसे पाटील यांना पुन्हा विरोधकांच्या आरोपांना सामोरे जावं लागणार की त्यांचे समर्थक प्रतिउत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

error: Copying content is not allowed!!!