क्राईम ताज्या घडामोडी पुणे शिरूर

गोळीबार, पाठलाग अन् दगडांनी हल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ…!

शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात सोमवारी सायंकाळी भरदिवसा झालेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेत सराईत गुन्हेगार विशाल काळे (वय 30, रा. शिरूर) याचा मृत्यू झाला असून केदार झाडगे हा जखमी झाला आहे. या घटनेमुळे शिरूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 1 जून रोजी सायंकाळी सुमारे 5 ते 5.30 वाजण्याच्या दरम्यान मौजे सरदवाडी (ता. शिरूर, जि. पुणे) गावच्या हद्दीत न्हावरा फाटा ते न्हावरा मार्गावरील राजस्थान ढाब्यासमोर ही घटना घडली. उमेश अनिल जगदाळे (वय 26), केदार झाडगे आणि विशाल काळे हे तिघे जण टोयोटा टायझर (क्र. MH 12 XQ 5104) या कारमधून न्हावरा बाजूकडून शिरूरकडे जात होते.यावेळी न्हावरा फाटा बाजूकडून न्हावरा गावाकडे जाणाऱ्या किया सोनेट (क्र. MH 14 LA 1128) या कारने त्यांच्या वाहनाला धडक दिल्याचे सांगितले जात आहे. धडकेनंतर सोनेट कारमधून चार ते पाच अज्ञात व्यक्ती खाली उतरल्या आणि त्यांनी टायझर कारच्या पुढील काचेवर सलग चार राऊंड गोळीबार करण्यात आली आहे.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे टायझरमधील तिघेही जण जीव वाचवण्यासाठी वाहनातून उतरून पळू लागले. त्याचवेळी घटनास्थळी एका मोटारसायकलवर दोन व्यक्ती आल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी रेकॉर्डवरील आरोपी सनी यादव आणि त्याच्या साथीदारांनी या तिघांवर गोळीबार केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या हल्ल्यात विशाल काळे हा जागीच मृत झाला. पोलिसांना घटनास्थळी त्याच्या चेहऱ्यावर व तोंडाच्या भागात दगडाने मारहाण केल्याच्या गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. मृतदेहाजवळ दोन रिकामे काडतुसे तसेच चार ते पाच मोठे दगडही आढळून आले आहेत. त्यामुळे गोळीबारासोबतच दगडांनीही हल्ला करण्यात आल्याची शक्यता तपासली जात आहे. दरम्यान, केदार झाडगे हा जखमी झाला असून त्याच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर शिरूर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उमेश अनिल जगदाळे हा घटनास्थळावरून पळून गेला होता. मात्र नंतर तो स्वतः पोलिस स्टेशनमध्ये हजर झाल्याची माहिती मिळाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, एकूण पाच ते सहा आरोपी एका सोनेट कार आणि एका दुचाकीवरून आले होते. हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पुरावे संकलित करण्यासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि इतर पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

आरोपी सनी यादव व त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी विविध तपास पथके रवाना करण्यात आली आहेत.विशेष म्हणजे, मृत विशाल काळे हा रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच हल्ल्यात संशयित असलेला सनी यादव (रा. बकोरी फाटा, वाघोली, पुणे) हाही सराईत गुन्हेगार आहे. त्यामुळे हा हल्ला जुन्या वैमनस्यातून किंवा गुन्हेगारी वर्चस्वाच्या वादातून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास शिरूर पोलीस करीत आहेत. पोलिसांकडून अधिकृत माहिती येणे अद्याप बाकी असून तपासानंतरच हल्ल्यामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

error: Copying content is not allowed!!!