क्राईम ताज्या घडामोडी पुणे शिरूर

जबर चोरी करत असतानाच घेतले ताब्यात;४ आरोपी अटकेत, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त..!

शिरूर : औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या रांजणगाव एमआयडीसी परिसरातील कंपनीतून केबल वायरची चोरी करणाऱ्या टोळीचा रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे १८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास रांजणगाव, खंडाळे माथा (ता. शिरूर, जि. पुणे) येथील स्पर्श इलेक्ट्रॉनिक कंपनीमधून अज्ञात चोरट्यांनी केबल वायरचे बंडल चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत अर्केज रामराव शिंदे (रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करताना रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तपास पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार परिसरात सखोल तपास सुरू असताना सीसीटीव्ही व तांत्रिक बाबींची तपासणीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला आणि पोलीस अमलदार उमेश कुतवळ यांच्या गुप्तदाराच्या मार्फत विकास संतोष पवार (वय २७, रा. मुखई, इंदिरानगर, ता. शिरूर), रोहित गणेश शिंदे (वय २०, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) आणि ओमकार फकिरा काळे (वय २०, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) यांना तळेगाव ढमढेरे येथे दुसरी घटना घडत असताना शिताफीने ताब्यात घेतले.चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपींनी चोरी केलेला माल फैजान इमरान खान (वय २३, रा. कोंढवा खुर्द, पुणे) याला विक्री केल्याचे उघड झाले आहे. त्यालाही अटक करण्यात आली असून मालवाहू कॅरी (वाहन) व दोन मोटारसायकली असा एकूण १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीच्या माध्यमातून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस अमलदार उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर, होमगार्ड राहुल इचके, शैलेश जगताप, बारकू गोडसे, रामदास शिंदे यांनी ही कामगिरी बजावली. पुढील तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे करीत आहेत.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!