सभापती पदाच्या मागणीवर वळसे पाटलांचे उत्तर.
केंदूर | नुकतीच जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक पार पडली, या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा सन्मान करंदी (ता. शिरूर) याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यावेळी वंदना प्रकाश पवार यांना पंचायत समितीचे सभापती पद मिळावे यासाठी प्रदीप वळसे पाटील यांच्याकडे मागणी करण्यात आली. यावर बोलताना प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले की, मी एक उत्तम वकील देखील आहे त्यामुळे आमदार दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या कोर्टात तुमची बाजू प्रखरपणे मांडतो.
त्याचं झालं असं की, पाबळ – केंदूर जिल्हा परिषद गटातील नवनिर्वाचित विजयी उमेदवार प्रफुल्ल शिवले, सुचेता सनी थिटे आणि वंदना प्रकाश पवार यांचा सन्मान सोहळा करंदी ग्रामस्थांनी आयोजित केला होता. यावेळी पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काळूराम भुजबळ आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कांताराम नप्ते यांची निवड झाली याबद्दल देखील हे दोन्ही करंदी गावचे सुपुत्र असल्याने ग्रामस्थांनी सन्मान आयोजित केला होता. भुजबळ आणि नप्ते हे दोघेही एकाच गावचे सुपुत्र पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्ष – उपाध्यक्ष पदावर काम करणारी पहिली जोडी ठरली आहे. त्यामुळे त्यांचा विशेष सन्मान आयोजित केला होता.
दरम्यान या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील उपस्थित होते. यावेळी प्रदीप वळसे पाटील यांच्याकडे करंदीचे माजी चेअरमन ज्ञानेश्वर दरेकर यांनी वंदना प्रकाश पवार यांना शिरूर पंचायत समितीचे सभापती पद मिळावे अशी जाहीर कार्यक्रमात मागणी केली. यावेळी प्रदीप वळसे पाटील यांनी देखील जबाबदारी न झटकता ‘मी एक चांगला वकील आहे, मी तुमची बाजू वळसे पाटील साहेबांच्या कोर्टात प्रभावीपणे मांडतो’, अशा प्रकारचे उत्तर देऊन एका उत्तम मोठ्या राजकीय नेत्यालाही जमणार नाही असे प्रसंगावधान राखल्याने प्रदीप वळसे पाटील यांनी उपस्थितांचे मन जिंकले.
शिरूर पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण देखील महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. त्याचबरोबर शिरूर तालुक्याच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या प्रकाश पवार यांच्या पत्नीला यावेळी प्रथम सभापती पदाची संधी मिळू शकते असे बोलले जात आहे. तर, या सभापती पदाच्या निवडीसाठी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ अमोल कोल्हे, आमदार माऊली कटके यांच्यात चर्चा होऊनच पुढील निर्णय होणार असला तरी, वळसे पाटील यांच्या जवळचे सहकारी म्हणून ओळख असलेल्या प्रकाश पवार यांच्या कुटुंबात ही संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.











Add Comment