ताज्या घडामोडी राजकीय शिरूर

पाबळ – केंदूर गटात मतांचा पाऊस- शिवलेंचा करिष्मा…!

कार्यकर्त्यांचा फौजफाटा – विजयाचा मार्ग

पाबळ | सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक मधल्या टप्प्यात चुरशीची झाली होती आणि अखेरच्या टप्प्यात पुन्हा प्रफुल्ल शिवले यांचा करिष्मा चालला. पाबळ – केंदूर गटात शिवले यांनी सर्व जुने – नवे विक्रम मोडीत काढून विजय संपादित केला. मतदारांनी प्रफुल्ल शिवले यांच्या पारड्यात प्रचंड मतांची झोळी रीती केली. केवळ शिवले यांचाच नव्हे तर सुचेता थिटे आणि वंदना पवार यांचा विजय देखील प्रफुल्ल शिवले यांच्यामुळे आणखी सुखकर झाला. 

राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाबळ – केंदूर गटात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी सुरुवातीला नाराजी व्यक्त केली, परंतु सर्व कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात प्रफुल्ल शिवले हे यशस्वी ठरले. प्रकाश पवार यांचा या गटात असलेला दांडगा जनसंपर्क शिवले यांच्या कामी आला तर पक्ष विरहित कार्यकर्त्यांचा फौजफाटा हा शिवलेंच्या विजयाचा प्रमुख मार्ग ठरला. भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही बाजूने आर्थिक ताकद लावण्यात आली परंतु प्रफुल्ल शिवले यांच्या आर्थिक नियोजनापुढे भाजपच्या विकास गायकवाड यांचे नियोजन सपशेल फेल ठरले, तर गावनिहाय असलेला कार्यकर्त्यांचा संच शेवटच्या दोन दिवसांत अधिक वेगाने कार्यान्वित करून शिवले यांनी प्रत्येक मतदारांपर्यंत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हजेरी लावली.

दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते एकजुटीने निवडणूक प्रचारात सहभागी झालेले पाहायला मिळाले. सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक मोठे मोठे पुढारी एका बाजूला असल्याचे चित्र दिसत होते परंतु प्रफुल्ल शिवले यांनी संपूर्ण लक्ष केंद्रित करून मोठ्या पुढाऱ्यांना देखील आपलेसे केले. सुरुवातीच्या काळात वंदना पवार या पाबळ पंचायत समिती गणात पराभवाच्या छायेत असल्याचे बोलले गेले मात्र, शिवले यांनी पाबळ गटात अधिक लक्ष केंद्रित केल्याने तीनही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. 

भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा असलेला अति  आत्मविश्वास, जनसंपर्क कमी, पक्षाच्या पातळीवर मिळालेली तोकडी मदत आणि नेहमीच पिछाडीवर असलेली प्रचार यंत्रणा यांसह आर्थिक नियोजनात कमतरता आल्याने विकास गायकवाड यांना मतदारांनी नाकारले. प्रत्येक गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात मतांची आघाडी ही कधीही राष्ट्रवादी पक्षाला मिळाली नव्हती याउलट गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी विभक्त असल्याने मतांचे विभाजन झाले होते, यावेळी मात्र केवळ भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता बाजूला राहिला उर्वरित सर्वच पक्षाचे कार्यकर्ते प्रफुल्ल शिवले यांच्या छत्राखाली एकत्र आले. 

शिरूर तालुक्यात सर्वाधिक मते मिळवून निवडून येण्यात शिक्रापूर- सणसवाडी गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोनिका हारगुडे यांनी विक्रम केला तर दुसऱ्या स्थानावर प्रफुल्ल शिवले यांचा नंबर पाहायला मिळत आहे. शिरूर तालुक्यातील सर्वाधिक गाजलेल्या लढतीपैकी राजेंद्र गावडे, सुजाता पवार, स्वाती पाचुंदकर, वृषाली वाळके, दीपाली गव्हाणे यांनी विजय मिळवला. 

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!