पाबळ (शिरुर): शिरुर तालुक्यातील पाबळ–केंदूर भागाच्या शेतीला अनेक वर्षांपासून पाणी मिळाले नाही, ही बाब दुर्दैवी असल्याचे स्पष्ट करत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भागाला पाणी देण्याची थेट राजकीय व प्रशासकीय जबाबदारी स्वतः स्वीकारली. “या प्रश्नावर आता केवळ चर्चा नव्हे, तर निर्णय होणार आहेत,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
पाबळ येथे आयोजित पाणी प्रश्नावरील बैठकीत बोलताना विखे पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भागासाठी सर्वेक्षणाचे आदेश दिले असून, त्या सर्वेक्षणावर आपण स्वतः लक्ष ठेवत आहोत. “यापुढे पाबळ–केंदूर भागात पाण्यासाठी मंत्री बोलवावा लागणार नाही, तर पाणी पूजनासाठी मंत्री म्हणून मी स्वतः येईन,” असे आश्वासन देत त्यांनी विरोधकांच्या आश्वासनांच्या राजकारणावर अप्रत्यक्ष टोला लगावला.चासकमान कालवा तसेच वढू बुद्रुक येथील भिमा नदीतून उपसा सिंचनाच्या माध्यमातून या भागाला पाणी देणे शक्य असल्याचे सांगत विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाकडून ठोस कार्यवाही होईल, असे स्पष्ट केले.
वर्षानुवर्षे पाण्याच्या प्रश्नावर राजकारण झाले, मात्र आता निर्णय घेणारे सरकार सत्तेत असल्याचा दावा त्यांनी केला. येत्या सहा महिन्यात या प्रश्नावर ठोस काम करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या वेळी पाबळ–केंदूर जिल्हा परिषद गटासाठी भाजपचे अधिकृत उमेदवार विकास गायकवाड, पाबळ पंचायत समिती गणाचे उमेदवार दीपक खैरे आणि केंदूर पंचायत समिती गणाच्या उमेदवार आशा साकोरे यांच्या प्रचारासाठी मंत्री विखे पाटील उपस्थित होते. विकास गायकवाड, दीपक खैरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
“या तीनही उमेदवारांना निवडून देणे ही मतदारांची जबाबदारी आहे. मात्र पाबळ–केंदूरला कायमस्वरूपी पाणी देण्याची जबाबदारी मी स्वतः मंत्री म्हणून स्वीकारली आहे,” असे सांगत त्यांनी निवडणूक आणि विकास यांचा थेट संबंध मतदारांसमोर मांडला.पाणी प्रश्नावर ठोस भूमिका मांडत भाजपने या भागात निर्णायक हस्तक्षेप केल्याचा राजकीय संदेश या सभेतून देण्यात आला. बैठकीस मोठ्या संख्येने शेतकरी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.











Add Comment