रांजणगाव गणपती : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. त्यातच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते यांचे कधी न भरून येणारे नुकसान झाले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रचार करणार नसल्याचे सर्व कार्यकर्त्यांना सांगितले आहे. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रांजणगाव येथे मोठी शोकसभा पार पडली.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ऐन तोंडावर असताना ही घटना घडल्याने राजकीय समीकरणेच बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला असून, कोणताही जल्लोष, सभा किंवा मिरवणूक न करता शांततेत केवळ पत्रकांद्वारे जनतेपर्यंत पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा निर्णय कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करणारा असून, ‘सत्ता नव्हे, संवेदना’ हा संदेश देणारा ठरत आहे.
दुसरीकडे भारतीय जनता पक्ष मात्र प्रचारात सरसावली आहे, सर्व प्रचार यंत्रणेचा वापर करत मतदारांशी संवाद करत प्रचाराचा जोर कायम केला आहे. यामुळे रांजणगाव कारेगाव गटात भाजपची प्रचारात आघाडी दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीर प्रचार थांबवल्याने भाजप पूर्ण ताकतीने प्रचारात उतरलेली दिसत आहे. अशातच पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात भाजपची सत्ता येण्यासाठी कार्यकर्ते शर्थीचे प्रयत्न करत आहे. परंतु राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला हा पुणे जिल्हा आणि शिरुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना सहानभूती किती मिळते हे पहावं लागणार आहे.
एकूणच, पुणे जिल्हा परिषद निवडणूक ही केवळ राजकीय लढत न राहता भावनांचा कौल ठरण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक श्रद्धांजलीसारखी असून, सहानुभूतीची लाट किती प्रभावी ठरेल, तर दुसरीकडे भाजप मात्र याच अशावेळी प्रचारात आघाडी घेताना पाहायला मिळत आहे. यामुळे येणाऱ्या काळात पुणे जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार हे येणारा काळच ठरवेल.











Add Comment