मैत्रीसाठी पदाचा त्याग; वळसे पाटलांकडे राजीनामा पाठवला.
शिक्रापूर | नुकतीच जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत आंबेगाव – शिरूर विधानसभा मतदारसंघातील शिरूरच्या ४२ गावात असलेल्या तीन जिल्हा परिषद गटांपैकी एकाच गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळाले. त्यातच आता मैत्री निभावत आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
पाबळ – केंदूर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळाले मात्र पाबळ – केंदूर गटात असलेल्या हिवरे गावचे माजी सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंबेगाव – शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या युवक संघटनेचे अध्यक्ष अमोल जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पाठवला असल्याचे सांगितले.
नुकत्याच झालेल्या निवडणूकीत अमोल जगताप यांचा पक्षातील सहभाग पहायला मिळाला नाही. दरम्यान अमोल जगताप यांचे जवळचे मित्र असलेले विकास गायकवाड आणि दीपक खैरे यांनी भाजपकडून अनुक्रमे जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लढवल्याने जगताप यांची कोंडी झाली होती. एका बाजूला पक्ष, विचारधारा आणि दुसऱ्या बाजूला मैत्री अशी अडचण निर्माण झाल्याने जगताप यांनी मैत्री निभावत पक्षाच्या पदाचा त्याग केला आहे. निवडणूक दरम्यान अमोल जगताप यांनी आमदार दिलीप वळसे पाटील यांना निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत माहिती देऊनच राजीनामा सुपूर्द केला असल्याचे जगताप यांनी सांगितले. राजकारणात पक्षापेक्षा मैत्रीला महत्त्व दिल्याचे एक उदाहरण जगताप यांनी दाखवून दिले आहे.
पाबळ – केंदूर गटात प्रफुल्ल शिवले यांनी प्रचंड बहुमतांनी निवडणूक जिंकली व सोबत असलेल्या दोनही पंचायत समितीच्या उमेदवारांना देखील विजय मिळवून दिला. प्रफुल्ल शिवले यांनी आयोजित केलेल्या उज्जैन देवदर्शन यात्रेमुळे शिवले यांचा विजय अगोदरच निश्चित झाला होता परंतु सोबत असलेल्या दोनही उमेदवारांसाठी शिवले यांनी मोठी मेहनत घेतली.
दरम्यान अमोल जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा मार्ग पत्करला होता. त्यानंतर काल (शनिवार २१ फेब्रुवारी) रोजी जगताप यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत यापूर्वीच पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले. जगताप यांचा राजीनामा झाला असला तरी आगामी काळात अमोल जगताप हे पक्षातच सक्रिय राहतात की पक्षातून बाहेर जातात हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
“
मी निवडणूक काळातच पदाचा राजीनामा आदरणीय वळसे पाटील साहेबांकडे पाठवला होता, माझे दोन्ही जवळचे मित्र इतर पक्षातून निवडणूक लढवत होते. राजकारण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य आहे, परंतु मित्र अडचणीत असताना मी विरोधात काम करणे हे माझ्या बुद्धीला सहन न झाल्याने मी निवडणूकीतून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. पक्षाचा पदाधिकारी असून अलिप्त राहणे हे संयुक्तिक न वाटल्याने अगोदरच पदाचा राजीनामा दिला होता". - अमोल जगताप











Add Comment