Uncategorized खेड पुणे राजकीय

पंचायत समितीची उमेदवारी नाकारणाऱ्याची आधी खुर्चीच घेतली, मग पंचायत समिती ताब्यात आणली.

आमदार बनून हिशोब चुकता केला.

वाचा सविस्तर..!

राजगुरूनगर | पुणे जिल्ह्यातील राजकारण म्हणजे अतिशय गुंतागुंतीचा विषय, त्यातल्या त्यात खेड तालुक्यातील राजकारण हे दर पाच वर्षांनी वेगवेगळ्या वळणावर गेलेलं पाहायला मिळते. खेड तालुक्यात अनेक वर्षे सहकारी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावर पकड असलेल्या माजी आमदार दिलीप मोहिते यांना एकेकाळच्या त्यांच्याच सहकाऱ्याने आसमान दाखवले आहे. 

सुरुवातीला राजगुरूनगर आणि परिसरातील चोवीस वाड्यांचे राजकारण जवळून अनुभवणाऱ्या, खेड तालुक्यातील राजगुरूनगर जवळ असलेल्या छोट्याश्या काळेचीवाडी गावचे सरपंच राहिलेल्या बाबाजी काळे यांनी आपल्या राजकीय सिमा वाढवण्यासाठी २०१२ ची पंचायत समितीची निवडणूक लढविण्याचा विचार केला. तशी तयारी देखील केली, आणि ऐनवेळी  तत्कालीन आमदार असलेल्या दिलीप मोहिते यांनी बाबाजी काळे यांना उमेदवारी नाकारली. काळे यांनी शेवटी अपक्ष निवडणूक लढवली परंतु अगदी थोडक्या मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. हार मानतील ते बाबाजी काळे कसले. काळे यांनी निश्चय केला. ‘आता उमेदवारी मागणाऱ्यांच्या नव्हे तर देणाऱ्यांची यादीत बसायचं’.! 

पंचायत समितीच्या निवडणूकीत पराभूत झालेल्या बाबाजी काळे यांना तत्कालीन आमदार दिलीप मोहिते यांनी राजकारणात दुर्लक्षित करायला सुरुवात केली. बाबाजी काळे आणखी पेटून उठले २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार दिवंगत सुरेश गोरे यांच्यामागे ताकद उभी केली. दिलीप मोहितेंच्या विरोधात आख्या खेड तालुक्यातील राजकीय ताकद एकवटली. अखेर दिलीप मोहितेंचा पराभव झाला आणि दिवंगत सुरेश गोरे हे आमदार झाले. 

पुढे २०१७ ची जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लागली तत्कालीन आमदार सुरेश गोरे यांनी काळूस – सांडभोरवाडी गटातून बाबाजी काळे  यांना पंचायत समितीची नव्हे तर जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेची उमेदवारी दिली. बाबाजी काळे यांनी या निवडणुकीत दिलीप मोहितेंच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला. एवढ्यावरच थांबतील ते बाबाजी काळे कसले. काळे यांचा राजकारणातील चांगुलपणा त्यांच्या कामी आला आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदावर त्यांची वर्णी लागली. 

‘आता थांबायचं नाय’ ही खूणगाठ मनाशी बांधलेल्या बाबाजी काळे यांना ताकद देणाऱ्या तत्कालीन आमदार सुरेश गोरे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत व्हावं लागलं. पुन्हा दिलीप मोहिते आमदार पदाच्या खुर्चीत बसले. दुर्दैवाने पुढे कोरोनाच्या काळात सुरेश गोरे यांचे निधन झाले. खचून जातील ते बाबाजी काळे कसले. पुन्हा बाबाजी काळे यांनी कंबर कसली आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा वापर संपूर्ण तालुक्याच्या विकासासाठी केला. संपूर्ण तालुकाभर संपर्काचे जाळे निर्माण केले. वारकरी संप्रदायाचा पाईक आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचे भक्त म्हणून बाबाजी काळे यांची तालुक्यात स्वच्छ प्रतिमा निर्माण झाली. बैलगाडा क्षेत्र, वारकरी संप्रदाय, आदिवासी भागातील दांडगा जनसंपर्क, तालुकाभर पसरलेले नातेवाईकांचे जाळे, विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी योग्य रणनीती, शांत- सय्यमी स्वभाव या सगळ्याच्या जोरावर बाबाजी काळे यांनी आमदार होण्याचा चंग बांधला. 

राज्यात महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवणार हे निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस पक्ष या तीनही पक्षात उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच सुरू असताना बाबाजी काळे यांनी मात्र जनसंपर्क वाढवण्यास भर दिला. भल्याभल्या नेत्यांनी उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवले. बाबाजी काळे यांना उमेदवारी मिळणार की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु माघार घेतली ते बाबाजी काळे कसले. मातोश्रीवर ठाण मांडून बसले अखेर एकादशीच्या दिवशी उमेदवारी मिळवणारे वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी म्हणून बाबाजी काळे यांनी अर्धी लढाई तिथेच जिंकली. आता लढाई होती ती सर्वपक्षीय नेत्यांची तालुक्यात जाऊन मोट बांधण्याची. सर्वसामान्य जनतेने या अगोदरच बाबाजी काळे यांना कौल दिला होता. तो म्हणजे जेवढे सर्वे झाले त्या सर्व सर्वेमध्ये बाबाजी काळे हे उजवेच होते. 

समोर बलाढय शक्ती, पुणे जिल्ह्यातील सर्वात तगड्या पक्षाचे दोन टर्म आमदार राहिलेल्या दिलीप मोहिते यांचे आव्हान होते. परंतु बाबाजी काळे हे प्रचंड आत्मविश्वास आणि इच्छा शक्ती असलेले व्यक्तिमत्त्व. २०१२ साली याच दिलीप मोहिते यांनी बाबाजी काळे यांची ताकद हेरली होती, म्हणूनच की काय, त्यावेळी पंचायत समितीची उमेदवारी नाकारली होती. परंतु बाबाजी काळे यांना पंचायत समितीची अपक्ष निवडणूक लढवावी लागली आणि पराभूत व्हावं लागलं. हीच सल मनात राहिली आणि विधानसभा निवडणुकीत शड्डू ठोकला. मोठ्या फरकाने अर्थात ५२ हजार मतांनी दिलीप मोहिते यांना पराभूत करून तालुक्याच्या आमदार पदाची खुर्ची काढून घेतली.  एवढ्यावरच थांबतील ते बाबाजी काळे कसले. 

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील बाबाजी काळे यांनी यंत्रणा कामाला लावली. आता टार्गेट होते पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सर्व जागा निवडुन आणायच्या. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र निवडणूक लढवत होते. राज्यभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा करिष्मा चालत नव्हता, मशाल हे चिन्ह नवखेच होते.  तरीही सर्व जागांवर काळे यांनी तगडे उमेदवार देऊन दिलीप मोहिते यांना आव्हान दिले. दिलीप मोहिते यांच्या ताब्यात असलेल्या ज्या पंचायत समिती सदस्य पदासाठी काळे यांना मोहिते यांनी उमेदवारी नाकारली होती, तीच पंचायत समिती मोहितेंच्या हातातून अलगद काढून घेतली. दिवंगत सुरेश गोरे यांचे स्वप्न पूर्ण करत खेड पंचायत समितीवर बाबाजी काळे यांनी एकहाती सत्ता मिळवली. जिल्हा परिषदेच्या देखील ८ पैकी ५ जागा निवडून आणल्या. 

खेड तालुक्यात अधोरेखित झाले. अनेकांनी संपलेली शिवसेना म्हणून अपमान केला, ओसाड गावची पाटीलकी मिळाली म्हणून हिनवले परंतु बाबाजी काळे यांनी दाखवून दिले की, सर्वसामान्य जनता कोणाच्या बाजूने आहे. आमदार झाल्यानंतर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर पुन्हा २०१२ ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. काळे यांना फक्त एक पंचायत समितीची उमेदवारी नाकारली, त्यातून पेटून उठलेल्या बाबाजी काळे यांनी त्याचा आता हिशोब चुकता केला आहे. 

Add Comment

Click here to post a comment

error: Copying content is not allowed!!!