Uncategorized

प्रवीण ढोकले हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवीन तालुका अध्यक्ष..!

वडिलांची पक्षनिष्ठा पडली मुलाच्या उपयोगी.

पाबळ | करंदी (ता. शिरूर) परिसरातील राजकारणात ढोकले कुटुंबाचा दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. करंदी येथील ढोकले कुटुंबातील राजाभाऊ ढोकले हे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या राजकीय परंपरेचा वारसा मुलगा प्रवीण ढोकले यांनीही समर्थपणे पुढे नेला आहे. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या युवक अध्यक्ष पदी प्रवीण ढोकले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत प्रवीण ढोकले यांनी आपल्या आई, माजी सरपंच शारदा ढोकले यांचा पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढविण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे स्थानिक राजकारणात वेगवेगळी स्थित्यंतरे पाहायला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. 

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य पदाचे उमेदवार आणि नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले यांनी पुढाकार घेत ढोकले कुटुंबाची मनधरणी केली. पक्षनिष्ठा जपणाऱ्या ढोकले कुटुंबाशी संवाद साधत त्यांनी तोडगा काढला. त्यावेळी प्रवीण ढोकले यांना आंबेगाव–शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

दरम्यान, अमोल जगताप यांनी संबंधित पदाचा राजीनामा दिल्यानंतर अखेर पक्षश्रेष्ठींनी प्रवीण ढोकले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे ढोकले कुटुंबाचा करंदी गावासह परिसरातील राजकीय प्रभाव अधिक दृढ झाल्याचे मानले जात आहे.

प्रवीण ढोकले यांच्या नियुक्तीमुळे युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, तसेच दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंबेगाव–शिरूर मतदारसंघात संघटन अधिक बळकट होईल, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे आगामी काळात प्रवीण ढोकले हे पक्ष वाढीसाठी काम करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!