Uncategorized

शेखर पाचुंदकर यांचा करिष्मा कायम; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलले.

रांजणगाव गणपती : अत्यंत चुरशीची लढत मानली जाणारी रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटाची निवडणूक शेवटच्या टप्प्यात अनेक वेगवेगळ्या अर्थाने चर्चेत राहिली. या भागात वर्चस्व असलेले शेखर पाचुंदकर यांनी गेल्या सात वर्षांपासून पुन्हा निवडणूक लढवण्याच्या उद्दिष्टाने संपूर्ण गट पिंजून काढला होता. जनसंपर्क दांडगा असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करूनही शेखर पाचुंदकर यांचा करिष्मा कायम राहिला आहे.

स्वाती पाचुंदकर विरुद्ध ज्योती पाचुंदकर अशा या लढतीत खर तर मानसिंग पाचुंदकर आणि शेखर पाचुंदकर या दोन भावांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सुरुवातीला कधी ज्योती तर कधी स्वाती पाचुंदकर आघाडीवर असल्याच्या सातत्याने चर्चा झाल्या परंतु मधल्या टप्प्यात मतदारांनी आपले मत गुलदस्त्यात ठेवल्याने अनेक पुढाऱ्यांना देखील मतदारांनी घोळवत ठेवल्याचा प्रकार पाहायला मिळाला.

रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातील निवडणूक निर्णय काय लागेल याचे कोणीही निवडणुकीत विश्लेषण करू शकत नव्हता. कारण एकाच कुटुंबातून दोन उमेदवार समोर आल्याने राजकीय वैमानस्य वाढत गेले. त्यातून अखेर एकाचा पराभव होणार होता, त्यामुळे गटात असलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी दोन्ही बाजूंकडे आपले संपर्क ठेवला होता.

त्याचबरोबर शेखर पाचुंदकर यांनी निवडणूक काळात मतदारांशी थेट घरोघरी जाऊन संपर्क साधल्याने मतदारांना आपलेसे करण्यात शेखर पाचुंदकर यांना पूर्ण यश आल्याचे पाहायला मिळत आहे. मानसिंग पाचुंदकर यांचा कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा फौजफाटा ही मानसिंग पाचुंदकर यांची जमेची बाजू होती. परंतु दोन्ही बाजूने आर्थिक नियोजन प्रचंड प्रमाणात झाल्यानंतरही या नियोजनात स्वाती पाचुंदकर यांचे वर्चस्व पहायला मिळाले आहे.

शेवटच्या दोन दिवसांमध्ये निवडणुकीचे कल वेगवेगळ्या बाजूने चर्चेत राहिले. दरम्यान मानसिंग पाचुंदकर यांची प्रचार यंत्रणा सैल पडल्याचे बोलले गेले, त्यामुळे स्वाती पाचुंदकर शेखर पाचुंदकर अधिक वेगाने प्रचार यंत्रणेत सहभागी झाले. त्यामुळे स्वाती पाचुंदकर यांच्यासोबतच मनीषा सतीश पाचंगे आणि सागर शिवाजी देवकर यांचा विजय सुखकर झाला.

दोन पाचुंदकरांच्या लढाईत वळसे कुटुंबाचा प्रचार यंत्रणेत मानसिंग पाचुंदकर यांच्या बाजूने कसलाही सहभाग पाहायला मिळाला नाही. दरम्यान स्वाती पाचुंदकर यांच्या विजयानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांचा जयघोष कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात केला. त्याचबरोबर शेखर पाचुंदकर यांच्या नावाचे ‘ भावी आमदार ‘ अशा आशयाचे बोर्ड मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांच्या हाती पाहायला मिळाले. त्यामुळे आगामी काळात शिरूर तालुक्याचे नेतृत्व या निवडणुकीतून उदयास आल्याचे बोलले जात आहे.

एकूणच रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटाची ही निवडणूक केवळ विजय-पराजयापुरती मर्यादित न राहता, कुटुंबांतर्गत राजकीय संघर्ष, कार्यकर्त्यांची भूमिका आणि मतदारांचा कौल यामुळे लक्षवेधी ठरली. शेखर पाचुंदकर यांचा करिष्मा आणि स्वाती पाचुंदकर यांचे वाढते वर्चस्व या निकालातून स्पष्टपणे अधोरेखित झाले असून, या विजयामुळे आगामी राजकारणाची दिशा देखील ठरवणारा संदेश मतदारांनी दिला आहे.

error: Copying content is not allowed!!!