पाबळ- केंदूर गटात नवीन ट्विस्ट.
केंदूर | करंदी गावच्या माजी सरपंच शारदा राजेंद्र ढोकले यांना केंदूर – करंदी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून अचानक उमेदवार जाहीर झाल्यानंतर करंदीच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बैठक घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नाराजी व्यक्त केली. गावातून एकतरी उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे उद्योजक प्रवीण ढोकले यांनी आपल्या आईच्या नावाची उमेदवारी बाबात घोषणा केली. तसा अपक्ष उमेदवारी अर्ज देखील दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पक्षावर नाराजी व्यक्त करत प्रवीण ढोकले यांनी सांगितले की, आमचे कुटुंब गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे. आई-वडिलांनी १५ वर्षे ग्रामपंचायतीत नेतृत्व केले असून, सरपंचपदाची संधी मिळाल्यानंतर करंदी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसची पकड अधिक मजबूत करण्यात प्राधान्य दिले. त्यामुळे विकासकामांचा अनुभव आहे, जनसंपर्क वाढवला आहे. या जोरावर उमेदवारी मिळायला हवी होती. परंतु उमेदवारी मिळाली नाही याचे दुःख आहे.
दरम्यान पक्षातील कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यासाठी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून प्रवीण ढोकले यांच्याशी अजित पवार यांचा संपर्क झाला असल्याचे प्रवीण ढोकले यांनी सांगितले. दरम्यान अजितदादा आणि वळसे पाटील साहेब यांनी भविष्यात संधी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर उमेदवारी मागे घेतली असल्याने येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार करणार असल्याचे ढोकले यांनी सांगितले.
दरम्यान करंदीचे माजी उपसरपंच नितीन ढोकले यांनी मध्यस्थी करत दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल शिवले, प्रकाश पवार, यांच्याकडे प्रवीण ढोकले यांची नाराजी बाबत माहिती दिली, त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या दृष्टीने वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्याशी संपर्क करून देत उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडले असल्याचे ढोकले यांनी सांगितले.
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर प्रवीण राजाभाऊ ढोकले यांनी सांगितले की, ”आमच्या कुटुंबाने सदैव पक्षाचे आणि समाजाचे हित जपले आहे. नेत्यांनी दिलेला शब्द आणि करंदीच्या विकासासाठी आम्ही वैयक्तिक उमेदवारीपेक्षा पक्षीय एकजुटीला महत्त्व दिले आहे. येणाऱ्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने घड्याळाचा प्रचार करून पक्षाला मोठे मताधिक्य मिळवून देऊ.” आगामी काळात अशा प्रकारच्या नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करून पक्षाच्या प्रचारात सक्रिय करण्याची जबाबदारी प्रफुल्ल शिवले यांची असणार आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर केल्यास शिवले यांचा विजय सुखकर होऊ शकतो.











Add Comment