रांजणगाव | रांजणगाव–कारेगाव या गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांना रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटाची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण गटात राजकीय हालचालींना वेग आला असून, निवडणुकीच्या वातावरणाला चांगलीच धार चढली आहे.
स्वाती पाचुंदकर यांनी यापूर्वी याच रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या कार्यकाळात रस्ते विकास, पिण्याच्या पाण्याच्या योजना, ग्रामविकासाशी संबंधित कामे, तसेच सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे स्थानिक पातळीवर बोलले जाते.
विकासकामांना प्राधान्य देणारी लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख मतदारांमध्ये निर्माण झाली आहे. सध्या निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर मतदारांशी थेट संवाद साधताना स्वाती पाचुंदकर यांनी आगामी राजकीय चित्र स्पष्ट शब्दांत मांडले. त्या म्हणाल्या, “येत्या काळात पुणे जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचीच सत्ता येणार आहे. राज्य आणि केंद्रात भाजपचे मजबूत नेतृत्व असताना विकासाची गती अधिक वेगाने पुढे जाणार आहे. या पार्श्वभूमीवर रांजणगाव–कारेगाव गटातील मतदार माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.”
आपल्या कार्यकाळाचा उल्लेख करत त्या पुढे म्हणाल्या की, “जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना केवळ राजकारण न करता विकासाला केंद्रस्थानी ठेवले. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधा या बाबींसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे आणि याच विश्वासाच्या जोरावर मी प्रचंड मताधिक्याने निवडून येईल, याची मला पूर्ण खात्री आहे.”
भाजप प्रवेशाबाबत बोलताना स्वाती पाचुंदकर यांनी सांगितले की, विकासाभिमुख धोरणे, शिस्तबद्ध संघटनात्मक रचना आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणारे नेतृत्व यामुळेच आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आगामी काळात रांजणगाव–कारेगाव गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
स्वाती पाचुंदकर यांच्या भाजप प्रवेशामुळे रांजणगाव–कारेगाव गटातील निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे असून, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या गटात मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. आगामी काळात प्रचार जसजसा तीव्र होईल, तसतशी या गटातील राजकीय लढत अधिक रंगतदार होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.











Add Comment