शिरूर : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत वात्सल्य सिंधू फाउंडेशन आणि कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर तालुक्यात महिलांसाठी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला तालुक्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून विविध गावांमधील तब्बल दहा संघांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेदरम्यान सर्व संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सामने अत्यंत चुरशीचे केले. प्राथमिक फेऱ्यांपासूनच खेळाडूंनी दमदार कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली. अखेरच्या सामन्यात श्री स्वामी समर्थ बाभूळसर आणि नवदुर्गा कारेगाव हे दोन बलाढ्य संघ अंतिम सामन्यात आमनेसामने आले.अंतिम सामना अतिशय रंगतदार आणि थरारक झाला. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आक्रमक तसेच चतुर बचाव करत सामना शेवटपर्यंत उत्कंठावर्धक ठेवला. मात्र निर्णायक क्षणी श्री स्वामी समर्थ बाभूळसर संघाने सरस खेळ करत नवदुर्गा कारेगाव ( प्रीती फलके, ज्योती कोल्हे, विशाखा नवले, अश्विनी जाधव, कंचना दरेकर, अर्चना भुमकर, रेखा गवारे, ज्योत्स्ना भुजबळ ) संघावर मात केली आणि अंतिम सामना जिंकत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील महिलांना क्रीडा क्षेत्रात आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळाली. आयोजकांच्या वतीने विजेत्या व उपविजेत्या संघांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे महिलांमध्ये क्रीडा भावना आणि आत्मविश्वास वाढीस लागल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.











Add Comment