शिरूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्याप्रमाणे दीर्घकाळ रखडल्या होत्या, त्याचप्रमाणे शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबतही तालुक्यात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, शिरूर ता.शिरूर जि.पुणे यांच्या निवडणूक कार्यक्रमास मंजुरी दिली असून निवडणूक प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली आहे.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची शेवटची निवडणूक सन २०१७ मध्ये पार पडली होती. तब्बल ९ वर्षांनंतर आता पुन्हा ही निवडणूक होत असल्याने इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या असून तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ तसेच महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती (समितीची निवडणूक) नियम २०१७ अन्वये ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे ग्रामीण यांनी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महत्त्वाचे निवडणूक दिनांक पुढीलप्रमाणे :
• २९ मे – अर्ज दाखल करण्यास प्रारंभ
• ५ जून – अर्ज छाननी
• २२ जून – अर्ज माघार अंतिम दिनांक
• २३ जून – अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध
• ५ जुलै – मतदान व मतमोजणी
या निवडणुकीत कृषी संस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था तसेच ग्रामपंचायत प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार प्राप्त होणार असून संबंधित सर्वांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शिरूर तालुक्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गटबाजी पाहायला मिळण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट राजकीय सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात असून बाजार समिती निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पार पाडण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.











Add Comment