ताज्या घडामोडी पुणे शिरूर

रांजणगाव गणपती मंदिर तीन महिन्यांसाठी बंद !

शिरूर तालुक्यातील प्रसिद्ध रांजणगाव गणपती मंदिर येथे व्यापक जतन व दुरुस्तीच्या कामांना सुरुवात होत असून, त्यासाठी मंदिर काही कालावधीसाठी भाविकांसाठी बंद ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सात मंदिरांच्या विकास आराखड्याअंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती तसेच जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेनंतर पुरातत्व विभागाकडून मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याची संरचना, सभामंडप, तसेच परिसरातील पायाभूत सुविधांची दुरुस्ती व सुशोभीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. या अनुषंगाने मंदिर काही काळासाठी पूर्णतः बंद ठेवण्याची विनंती करण्यात आली होती. या प्रस्तावाला संबंधित प्रशासन, देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामसभेची मान्यता मिळाली आहे.

त्याअनुषंगाने, १५ एप्रिल २०२६ पासून ३१ जुलै २०२६ पर्यंत मंदिर भाविकांसाठी पूर्णतः बंद राहणार आहे. या कालावधीत मंदिरातील नित्यपूजा, धार्मिक विधी आणि परंपरागत सेवा नियमितपणे सुरू राहतील, मात्र कोणत्याही भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून विशेष उपाययोजना करण्यात येत असून, मंदिराबाहेरील ठिकाणी एलईडी स्क्रीनद्वारे थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे दूरवरून येणाऱ्या भाविकांना किमान दर्शनाची सोय मिळणार आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने, मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर काम सुरू असणार असल्यामुळे, संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा उपाय उभारण्यात येणार आहेत. कामाच्या ठिकाणी अनधिकृत प्रवेश पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असून, प्रशासनाकडून विशेष देखरेख ठेवली जाणार आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत मुख्य दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, ३१ जुलै २०२६ रोजी मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित किरकोळ कामे टप्प्याटप्प्याने सुरू राहतील. यावेळी प्रशासन, देवस्थान ट्रस्ट आणि रांजणगाव गणपती ग्रामस्थ या बैठकीला उपस्थित होते.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!