शिरूर, पुणे | करंदी ( ता. शिरूर) ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल लागून एक वर्ष पूर्ण झालं. निवडणुकीत दिलेले आश्वासनपूर्ती करण्यास करंदी ग्रामपंचायत असफल ठरली का ? असा सवाल उपस्थित होत आहे. गावठाणमधील पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने अजूनही करंदी गावठाणातील नागरिक पाण्याच्या प्रतिक्षेतच आहे.
वार्ड क्रमांक पाच मधील म्हणजेच गावठाण मधील तिनही उमेदवार निवडून द्या, तीनही उमेदवार निवडून आल्यास पहिला नारळ पाणी पुरवठा योजनेचा फोडला जाईल असे छातीठोक आश्वासन पॅनेलप्रमुख शंकर जांभळकर यांनी दिले होते. मतदारांनी देखील विक्रमी मतदान देऊन या तिनही उमेदवारांना निवडून दिले. शिवाय याच वार्डमधून निवडून आलेल्या सुभद्रा ढोकले यांनी सरपंच म्हणून कार्यभार स्वीकारला मात्र अद्याप ना नारळ फुटला, ना पाणी मिळाले.
शासनाने लाखो रुपये खर्च करून करंदीत नवीन पाईपलाईन, नवीन टाकी उभारून पाणी पुरवठा योजना राबविली मात्र त्याचा काहीच उपयोग होत नसल्याने हंडाभर देखील पाणी नागरिकांना मिळत नाही याच प्रमुख मुद्यावर वार्ड पाचमधील निवडणूक गाजली. नवीन ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ आल्यानंतर पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा होती शिवाय अश्वासनही मिळाले. अधिकाऱ्यांनी पाहणी केली लवकरच यावर तोडगा काढू असे अधिकाऱ्यांनी आश्वासनही दिले मात्र अद्यापही पाणी पुरवठ्याचा प्रश्न प्रलंबितच आहे.
दरम्यान मतदान मिळवण्यासाठी दिलेले आश्वासन का पूर्ण करू शकले नाही ? याबाबत विचारणा केल्यावर केवळ प्रशासकीय बाब असल्याचे कारण देण्यात येते. नेमकं पाणी मिळणार कधी असा सवाल शरद दरेकर यांनी उपस्थित केला आहे.
कोरोनाच्या महामारीत करंदी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशाला कात्री लावून गावातील कोरोना बाधित नागरीकांना आर्थिक मदत केली. सूक्ष्म नियोजन करून कोरोनापासून गाव दूर ठेवण्यासाठी यथायोग्य प्रयत्न देखील केले. अवैध दारू धंदे बंद करण्याची धडाकेबाज मोहीम राबविली. विविध विकासकामांचे प्रस्ताव तयार आहेत तर काही कामांना मंजुरी मिळाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत दिलेल्या प्रमुख आश्वासनापैकी पाणी पुरवठा सुरळीत करणे आणि अवैध दारू धंदे बंद करणे याबाबत मात्र ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ असफल ठरले आहे
Add Comment