Uncategorized

एका सरपंचाच्या राजीनाम्याची पहिली गोष्ट.

गावचं सरपंच पद मिळावं यासाठी गावगाड्यातील अनेक पुढारी वेगवेगळ्या क्लुप्त्या करतात. मोठ्या ग्रामपंचायतमध्ये बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य पद मिळालं तर या पुढाऱ्यांची चांदीच आणि त्याहून सरपंच पद मिळालं तर सोन्याहून पिवळं. अनेकांना सरपंच पद केवळ मिरवायला हवं असतं तर काहींना पदाच्या माध्यमातून अर्थार्जन व्हावं अशी अपेक्षा असते, तर मोजक्यांना गावचा विकास करायचा असतो.
असंच एका गावच्या सरपंच पदाचं स्वप्न डोळ्यासमोर ठेवून छबुरावने ग्रामपंचायत सदस्य पद आपल्या पदरात पाडून घेतलं होतं. परंतु पुढे जे झालं ते तर अनपेक्षितच होतं.


त्याचं झालं असं की, पुणे जिल्ह्यातील एका तालुक्याच्या पश्चिम भागातील एका मोठ्या गावच्या ग्रामपंचायत सरपंच पदाच्या कार्यकाळाची वाटाघाटी ग्रामपंचायत सदस्यांनी मिळून आपापसात केली होती. ग्रामपंचायत सदस्य असलेल्या अनेकांनी सरपंच पदावर आपली वर्णी लागावी यासाठी प्रयत्न केले होते. दरम्यान काही महिन्यांचा सरपंच पदाचा कार्यकाळ या वाटाघाटीत एका नामांकित सदस्याला अर्थात छबुरावला ठरवून देण्यात आला होता. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आपला राजीनामा देऊन इतरांना संधी देण्याचे आश्वासन देखील या छबुरावांनी इतर सदस्यांना दिले होते. परंतु या नामांकित सदस्याला अर्थात छबुरावांना सरपंच पद सोडण्याची कदाचित इच्छा नसावी म्हणून की काय, राजीनामा देण्यासाठी विलंब होत असल्याचे काही सदस्यांच्या लक्षात आले. या सदस्यांनी संबंधित सरपंचाला जाब विचारायचे ठरवले. परंतु छबुरावांचे मित्र आणि ग्रामपंचायत सदस्य असलेले आबुराव यांचा या राजीनाम्याला विरोध होता. हे उर्वरित सदस्यांच्या निदर्शनास आले.


राजीनामा देण्यासाठी म्हणून तालुक्याच्या गावाला गेलेले छबुराव सरपंच आणि इतर काही सदस्य यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. विलंब झाला असला तरी ठरल्याप्रमाणे सरपंच महोदयांनी राजीनामा द्यायला हवा अशी उर्वरित सदस्यांची तीव्र इच्छा होती. या सगळ्या तणावाच्या वातावरणात सरपंच महोदयांची बाजू रेटून नेणाऱ्या आबुरावांच्या भूमिकेवर इतर सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
दरम्यान या सगळ्या गरमागरम वातावरणात सरपंच महोदयांना राजीनाम्यापासून परावृत्त करणाऱ्या आबुरावांना काही सदस्यांनी बाजूला नेऊन त्यांचा चांगलाच समाचार घेतला. वातावरण आणखीनच तणावाचे झाले. ही सगळी परिस्थिती बघता छबुराव अर्थात सरपंच महोदयांची घाबरगुंडी उडाली, इतर सदस्यांची किंवा कोणाचीच वाट न बघत थेट तालुक्याच्या गावातून छबुरावांनी धूम ठोकली.


आबुरावांना काही सदस्यांनी बाजूला नेऊन खरमरीत समाचार घेतल्याचे छबुरावांना समजले. उर्वरित इतर सदस्य संतप्त झालेले पाहून सरपंच महोदयांनी आपला राजीनामा दुसऱ्याच दिवशी तालुक्याच्या गावाला जाऊन गपगुमान साहेबांच्या टेबलावर टेकवला. ‘तेरी भी चूप अन् मेरी भी चूप’ अशीच काहीशी परिस्थिती छबुरावांच्या राजीनाम्याची झाली परंतु छबुराव चार- सहा गावात नामांकित पुढारी असल्यामुळे छबुरावांच्या राजीनाम्याची कहाणी परिसरातील गावांत चांगलीच व्हायरल झाली. आबुरावांना पुढे करून राजीनाम्याला विलंब करण्यासाठी केलेल्या क्लुप्त्या छबुरावांना चांगल्याच महागात पडल्या.

error: Copying content is not allowed!!!