शिरूर : पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या रांजणगाव गणपती हद्दीत तिहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. दोन चिमुकल्यांसह एका स्त्रीचा अर्धजळीत मृतदेह आढळल्याने शिरूर तालुक्यासह पुणे जिल्हा हादरून गेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव गणपती (ता. शिरूर जि. पुणे ) गावच्या हद्दीत असलेल्या ग्रोवेल कंपनी शेजारी लक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे निर्जन ठिकाणी दोन चिमुकल्यांसह एका स्त्रीचा अर्धजळीत मृतदेह आढळून आला आहे. स्ञीचे वय अंदाजे 25 ते 30 वर्ष, एक मुलगा वय अंदाजे तीन ते चार वर्षे व एक मुलगा वय अंदाजे एक ते दोन वर्ष असे आहे. या तिघांना प्रथम हत्याराने जीवे ठार मारण्यात आले आणि पुरावा नष्ट व्हावा यासाठी जाळून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अद्यापपर्यंत या घटनेतील मृतदेहांची ओळख पटलेली नाही. पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी घटनास्थळी भेट दिली असून रांजणगाव एमआयडीसी पोलिस यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मृतदेहांचे वर्णन…
एक महिला वय अंदाजे 25 ते 30 वर्ष, उजवे हाताचे मनगटावर बदाम चिन्ह व त्यापुढे mom Dad इंग्रजीत गोंदलेले, पाठीमागील बाजूस बदामामध्ये, R व S व त्यापुढे Rajratan व जय भीम असे गोंदलेले आहे. डावे हातावर फुलांची डिझाईन. एक मुलगा वय अंदाजे 3 ते 4 वर्ष, एक मुलगा वय अंदाजे 1 ते 2 वर्ष
गुन्ह्याचे घटनास्थळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, एसडीपीओ बापूराव दडस दौड उपविभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलीस ठाण्याचे महादेव वाघमोडे पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्टाफ तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व स्टाफ यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. त्याचप्रमाणे गुन्ह्याचे घटनास्थळी फॉरेन्सिक टीम डॉग स्कॉड, फिंगरप्रिंट यांनी भेट दिलेली आहे. मयत महिला व मुलांची ओळख पटवून आरोपी शोध करता वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत.
Add Comment