राजकीय शिरूर

केंदूर- पाबळ गटातील वादळापूर्वीची शांतता भंगली…!

राष्ट्रवादीकडून धक्कातंत्र, नवे राजकीय समीकरण.

पाबळ | शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागात महत्वपूर्ण असलेल्या केंदूर – पाबळ जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एक जिल्हा परिषद सदस्य पदासाठी तर दोन पंचायत समिती सदस्य पदासाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. हे उमेदवार जाहीर करण्याअगोदर पक्षाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी या उमेदवारांची घोषणा केली.

राज्यातील महापालिका निवडणुकीचे अनपेक्षित निकाल जाहीर होत असताना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयारी सुरू झाली आहे. केंदूर – पाबळ गटात जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक दिग्जजांनी तयारी केली होती. त्यामध्ये प्रकाश पवार, सुभाष उमाप, प्रमोद पऱ्हाड या मातब्बर पुढाऱ्यांचा देखील समावेश होता. परंतु आमदार माऊली कटके यांचे विश्वासु सहकारी म्हणून ओळखले जाणारे प्रफुल्ल शिवले यांनी देवदर्शन यात्रा आयोजित करून मतदारांना आपलेसे केले. त्यामुळे प्रफुल्ल शिवले यांना उमेदवारीसाठी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील हिरवा कंदील दिला.

तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष असलेले सनी रामशेठ थिटे यांच्या पत्नी सुचेता सनी थिटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देत केंदूर गणातून पंचायत समितीची उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे पाबळ गणातून माजी सभापती प्रकाश पवार यांच्या पत्नी वंदना प्रकाश पवार यांना उमेदवारी देऊन माजी मंत्री वळसे पाटील यांनी वेगळाच प्रयोग करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा केंदूर पाबळ गटातील पॅनल अधिक मजबूत केला आहे.

अशा प्रकारच्या केंदूर- पाबळ गटातील तीन उमेदवारी आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी जाहीर केल्या. अचानक उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या गटातील अनेक पदाधिकारी अचंबित झाले आहेत. केंदूर – पाबळ गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक कार्यकर्ते असलेला हा जिल्हा परिषद गट म्हणून ओळखला जातो. पक्षाचे अनेक तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर पदाधिकारी याच गटात सर्वाधिक पाहायला मिळतात. दरम्यान कमालीची गुप्तता पाळत झालेले पक्ष प्रवेश व दिल्या गेलेल्या उमेदवारी याबाबत गावागावात जाऊन अनेक सामान्य कार्यकर्त्यांची मनधरणी करावी लागणार एवढे मात्र नक्की.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांत असलेला हा केंदूर – पाबळ जिल्हा परिषद गट आगामी काळात या नवीन राजकीय समीकरणामुळे सर्वाधिक चर्चेत येणार आहे. दरम्यान या जिल्हा परिषद गटात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले विकास गायकवाड, माजी सरपंच दीपक खैरे यांच्या भूमीकांकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

error: Copying content is not allowed!!!