शिरूर: पुणे जिल्ह्यातील सोने सांगवी गावातील अज्ञात हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात १४ वर्षीय अपंग मुलीचा मृत्यू झाल्याची अत्यंत गंभीर व चिंताजनक घटना उघडकीस आली आहे. सदर घटनेमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था तसेच नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे. या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. मृत मुलीचे नाव मेघना ईश्वर काळे (वय १४, अपंग) असे असून ती सोने सांगवी येथील रहिवासी होती. या घटनेची माहिती मृत मुलीचे नातेवाईक सोमनाथ सोनगीर काळे (वय ५०, व्यवसाय – मजुरी) यांनी रांजणगाव पोलीस ठाण्यास दिली आहे.
प्राथमिक चौकशी व पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घरातील सदस्य जागे झाल्यानंतर घरालगतच्या परिसरात मेघना काळे ही रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आली. तिच्या गळ्याच्या भागात तसेच पायाच्या मांडीवर खोल, गंभीर व जीवघेण्या जखमा आढळून आल्या आहेत. सदर जखमांचा स्वरूप व खोली पाहता अज्ञात हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिस व वन विभागाकडून नोंदविण्यात आला आहे.
घटनेची माहिती प्राप्त होताच रांजणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तातडीने घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा व प्राथमिक तपासाची कार्यवाही करण्यात आली. त्याचप्रमाणे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये श्री. विकास भोसले (RFO, मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी), श्री. पी. एस. शिंदे ( वन परिमंडल अधिकारी, शिरूर ) तसेच श्री. एस. ए. चव्हाण ( नियत क्षेत्र अधिकारी, शिरूर ) यांचा समावेश आहे. तसेच डॉ. अविनाश विसलकर, पशुवैद्यकीय अधिकारी, माणिकडोह बिबट निवारण केंद्र, जुन्नर यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेहावरील जखमांची तांत्रिक व शास्त्रीय तपासणी केली. पुढील वैज्ञानिक निष्कर्षासाठी जखमेच्या ठिकाणावरून स्वॅब नमुने ताब्यात घेण्यात आले असून ते प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे. या तपासणीअंती हल्ला करणाऱ्या प्राण्याची निश्चित ओळख पटविण्यात येणार आहे.
सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलिस व वन विभाग संयुक्तपणे या घटनेचा सखोल तपास करीत आहेत. परिसरात संभाव्य धोक्याची शक्यता लक्षात घेता, वन विभागामार्फत पथके तैनात करण्यात आली असून हा हल्ला बिबट्याचा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
या गंभीर घटनेनंतर सोने सांगवी व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, विशेषतः रात्री व पहाटेच्या वेळेत नागरिकांनी अनावश्यक हालचाली टाळाव्यात, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.











Add Comment