शिरूर : पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र सुरक्षा दलात भरती करून देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक युवक-युवतींची फसवणूक करून त्यांना एका ठिकाणी डांबून ठेवण्याचा प्रकार शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे घडला आहे. तब्बल ४७ युवकांची रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी सुटका केली असून दोन आरोपीना अटक करण्यात आला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुन्ना राजू शिंदे (वय 21, रा. पानमळा, शिर्डी, ता. राहता, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अवध कलीम बिनसाद (रा. श्रीरामपूर) व ज्ञानेश्वर महादेव धायतडक (रा. धायतडकवाडी, ता. पाथर्डी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात अमोल आवटे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. श्रीरामपूर) हा तिसरा आरोपी असून तो अद्याप फरार आहे.
दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजता रांजणगाव गणपती गावच्या हद्दीतील सुखकर्ता मंगल कार्यालय येथे हा प्रकार घडला. आरोपींनी एम.एस.एफ. फोर्स एजन्सीमार्फत रांजणगाव एमआयडीसीतील कंपनीत बंदोबस्ताचे काम देतो, आठ तासांचे काम व 16 हजार रुपये पगार देतो, असे आमिष दाखवून फिर्यादीसह एकूण 37 मुले व 10 मुलींकडून ड्रेस व किटसाठी एकूण 70 हजार रुपये घेतले. मात्र, पैसे घेतल्यानंतर संबंधित तरुणांना कोणतीही नोकरी देण्यात आली नाही. तसेच पैसे परत मागितल्यावर आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करून पैसे देण्यास नकार दिला. या प्रकरणी फिर्यादीच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिनसाद, धायतडक या दोन आरोपी यांना पोलिसांनी अटक केली. फसवणूक केलेली रक्कम अद्याप जप्त करण्यात आलेली नाही.
या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक महादेव वाघामोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोरे करत असून गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस हवालदार सरजीने यांनी केले आहे.











Add Comment