मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची एक महत्त्वाची बैठक मुंबईतील नवीन प्रशासन भवन येथे पार पडली. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्षाच्या वतीने ॲड. संग्रामसिंह शेवाळे उपस्थित होते. त्यांनी पक्षाची भूमिका मांडताना स्पष्टपणे नमूद केले की, ज्या महानगरपालिका व जिल्हा परिषदांनी आरक्षणाची घटनात्मक मर्यादा ओलांडलेली नाही, तसेच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही न्यायालयीन निर्णयाच्या अधीन नाहीत, अशा संस्थांच्या निवडणुका लांबणीवर न टाकता शक्य तितक्या लवकर घेण्यात याव्यात.
तसेच ॲड. शेवाळे यांनी सांगितले की, लोकशाही व्यवस्थेत निवडणुका वेळेवर होणे अत्यंत आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीची पहिली पायरी असून, निवडणुका रखडल्यामुळे प्रशासकीय राजवटीचा कालावधी वाढत आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या मूलभूत सुविधा, विकासकामे व लोकप्रतिनिधित्वावर होत आहे. त्यामुळे न्यायालयीन अडथळे नसलेल्या संस्थांमध्ये तातडीने निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी यावेळी केली.
या बैठकीत राज्यातील विविध मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रमुख व प्रतिनिधी, तसेच राज्य निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सर्व पक्षांनी आपापल्या भूमिका मांडत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतच्या अडचणी, कायदेशीर बाबी व संभाव्य उपाययोजनांवर चर्चा केली.
राज्य निवडणूक आयोगाने सर्व पक्षांच्या सूचनांची नोंद घेत असून, कायदेशीर चौकटीत राहून निवडणूक प्रक्रिया राबविण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. या बैठकीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात लवकरच ठोस निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.











Add Comment