राजकीय शिरूर

आयाराम गयाराम बाहेरच ठेवा, भाजप कार्यकर्त्यांनी मौन सोडले..!

केंदूर – पाबळ गटात भाजपकडून मोर्चेबांधणी.

पाबळ | पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी द्यावी. पक्षाशी बेईमानी करणाऱ्या राजकीय व्यावसायिक पुढाऱ्यांना पक्षाने उमेदवारी देऊ नये, यासाठी केंदूर – पाबळ जिल्हा परिषद गटातील भाजपच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे आग्रह धरला आहे. भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष भगवान शेळके त्याचबरोबर पुणे भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी अमित सोनवणे यांनी पक्षाकडे केंदूर- पाबळ जिल्हा परिषद गटासाठी उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे पक्षात सक्षम आणि निष्ठावान कार्यकर्ते असताना बाहेरून पक्षात उमेदवारीसाठी येणाऱ्या पुढाऱ्यांना संधी देऊ नये अशी मागणी वरिष्ठ नेत्यांकडे केली असल्याचे भगवान शेळके आणि अमित सोनवणे यांनी सांगितले.

केंदूर- पाबळ जिल्हा परिषद गटातून नेतृत्व केलेल्या जयश्री पलांडे या देखील भाजपच्या एक प्रमुख पदाधिकारी म्हणून या भागातून पक्षाचे नेतृत्व करतात, तर भगवान शेळके यांनी देखील दोन वेळा जिल्हा परिषद, दोन वेळा पंचायत समिती निवडणूक लढवली आहे. त्यामुळे या गटाची उमेदवारी देताना या प्रमुख पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच उमेदवारी दिली जाईल अशी खात्री अमित सोनवणे यांनी व्यक्त केली.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रमोद पऱ्हाड यांनी एकदा पंचायत समिती तर त्यांच्या पत्नीने देखील एकदा पंचायत समितीची निवडणूक लढवली आहे. त्यामुळे स्वतः प्रमोद पऱ्हाड यावेळी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी तीव्र आग्रही आहेत. तर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष उमाप यांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांच्या नावाची चर्चा अधिक जोर धरू लागली आहे.

तर अद्याप पक्षीय भूमिका जाहीर न केलेले प्रफुल्ल शिवले यांनी मात्र प्रचाराचा जोर वाढवला आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्षीय भूमिका जाहीर करणार असल्याचे स्पष्ट संकेत शिवले यांनी दिले आहेत. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय असलेले प्रफुल्ल शिवले यांनी पत्नीच्या माध्यमातून यापूर्वी पंचायत समितीची निवडणूक भाजपकडून लढविली होती. त्यामुळे पुन्हा जिल्हा परिषदेची निवडणूक देखील शिवले भाजपकडूनच लढवतील आशा चर्चा सातत्याने होत असताना मात्र भाजप पदाधिकाऱ्यांनी आता मौन सोडले आहे.

दरम्यान ‘The बातमी’शी बोलताना इच्छुक उमेदवार अमित सोनवणे यांनी सांगितले की, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या न्यायासाठी आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हा माझा लढा आहे. धनशक्तीच्या बळावर चालणाऱ्या राजकारणाविरुद्ध उभे राहून, सामान्य कार्यकर्त्यांनाही संधी मिळावी. भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून गेली २५ वर्षे निष्ठेने पक्षाचे काम करत आहे. स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या प्रवृत्ती आपण पाहतच आहोत. गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा गैरमार्गाने कमावलेल्या पैशातून राजकारण करणाऱ्या लोकांना रोखणे आणि लोकशाही मजबूत ठेवणे, हा माझ्या लढ्याचा खरा उद्देश आहे. अनेक गरीब व सामान्य कार्यकर्त्यांना धनशक्तीच्या दबावामुळे माघार घ्यावी लागू नये, यासाठी मी सातत्याने झटत आहे.

त्यामुळे वरवर शांत वाटणारा केंदूर- पाबळ जिल्हा परिषद गट आगामी काळात अनेक विषयांनी चर्चेत येणार असल्याने या गटातील निवडणूक बहुचर्चत राहणार एवढं मात्र नक्की..!

error: Copying content is not allowed!!!