प्रकाश पवार रिंगणात? ; शिवलेंचा प्रचार शिगेला.
पाबळ | शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागात असलेला अत्यंत महत्वाचा जिल्हा परिषद गट म्हणून केंदूर – पाबळ जिल्हा परिषद गट ओळखला जातो. या भागाचे नेतृत्व अनेक मातब्बर नेत्यांनी केले. माजी मंत्री बाप्पूसाहेब थिटे, काकासाहेब पलांडे, बाळासाहेब खैरे, जयश्री पलांडे, मंगलदास बांदल यांसारख्या अनेक मातब्बर नेत्यांनी या भागातून निवडणूक लढवली आहे. नव्याने नेतृत्व करू पाहणाऱ्या वढू बुद्रुकचे माजी सरपंच आणि उद्योजक प्रफुल्ल शिवले यांनी या गटातून निवडणूक लढविण्याची पूर्ण तयारी केली आहे. देवदर्शन यात्रा, घरोघरी जाऊन गाठीभेटी घेण्यावर शिवले यांचा जोर आहे. गेल्या चार महिण्यापासून शिवले यांनी या गटातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी देवदर्शन यात्रा, बैलगाडा शर्यत, गणेश उत्सवात मंडळांना देणगी या माध्यमातून संपर्क साधला आहे.
प्रफुल्ल शिवले यांचा मतदारांना आकर्षित करण्याचा फंडा पाहून अनेक इच्छुक उमेदवारांनी आपल्या तलवारी म्यान केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले प्रकाश पवार यांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना नियमित देणगीच्या स्वरूपात कुटुंबियांच्या माध्यमातून संपर्क ठेवला, प्रमोद पऱ्हाड यांचा देखील सार्वजनिक कार्यक्रमात संपर्क कायम आहे, सुभाष उमाप यांनी देखील निवडणुकीच्या दृष्टीने अनेक पाऊले उचलली, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इच्छुक असलेले शंकर जांभळकर आणि सनी थिटे यांनी मात्र मतदारांशी संपर्क तोडल्याचे चित्र पाहायला मिळते अर्थात पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीच खाली मतदारांशी संवाद तोडल्याने ही नामुष्की ओढवली असल्याचे बोलले जाते.
गेल्या काही वर्षांपासून या जिल्हा परिषद गटात शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांचे वर्चस्व पाहायला मिळते. नंदकुमार पिंगळे यांची २०१२ ची जिल्हा परिषद निवडणूक, सविता बगाटे यांची २०१७ ची जिल्हा परिषद निवडणूक किंवा त्यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये देखील प्रकाश पवार यांचा सक्रिय सहभाग पाहायला मिळाला आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रकाश पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळू शकते तर प्रकाश पवार यांच्या समर्थकांनी देखील दोन दिवसांपासून तोच आग्रह धरला असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर प्रकाश पवार यांच्या समर्थकांकडून “आता थांबायचं नाही, आता लढायचं” अशा स्वरूपाचे पोस्टर व्हायरल केले जात आहेत.
यावर प्रकाश पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगितले, वरीष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमात प्रकाश पवार यांची उपस्थितीती कमी पाहायला मिळाली होती त्यावर स्पष्टीकरण देताना पवार यांनी सांगितले की, “ऊस तोडणीचा आणि कांदे काढणीचा काळ सुरू आहे, त्यामुळे शेतीच्या कामात व्यस्त होतो, शेतीची कामे आटपून पुन्हा सहकाऱ्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ”. दरम्यान प्रकाश पवार यांचा या गटातील जनसंपर्क पाहता त्याचबरोबर नव्याने या गटात राजकारण करू पाहणाऱ्या प्रफुल्ल शिवले या दोघांमध्ये ही निवडणूक रंगली तर निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात हा गट चर्चेत येणार एवढं मात्र नक्की. त्यामुळे केंदूर- पाबळ गटात सध्यातरी वादळापूर्वीची शांतता पाहायला मिळत आहे…!











Add Comment