ताज्या घडामोडी पुणे शिरूर

कोर्टाच्या आदेशामुळे जिल्हाधिकारी पिंपळे जगताप मध्ये तात्काळ दाखल.

पिंपळे जगताप, शिरूर – चासकमान धरण प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचं पिंपळे जागताप (ता. शिरूर) येथे रहिवासी पुनर्वसन केले मात्र त्याठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या अतिक्रमणाचा अहवाल उच्च न्यायालयाने तातडीने मागितला त्यामुळे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी थेट जागेवर येऊन स्थळ पाहणी केली आहे.
आज बुधवार (दि. ४) रोजी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या सोबत प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख, यांनी पिंपळे जगताप येथील चासकमान प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना आरक्षित केलेल्या जागेचा स्थळ पाहणी पंचनामा केला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक रहिवासी आणि ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
दरम्यान ज्या जागेवर स्थानिकांचे अतिक्रमण आहे अशा रहिवाशांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासमोर आपले म्हणणं मांडले यामध्ये, आम्ही १९७६ सलापासून या जागेवर वास्तव्यास आहे. ही जागा १९९२ च्या सुमारास प्रकल्प बाधितांसाठी आरक्षित केली मात्र शासनाने आमचा विचार न करता ही जागा आरक्षित केली त्यामुळे शासनाने आमच्यावर अन्याय करू नये असा युक्तिवाद केला यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रवक्ते चंदन सोंडेकर यांनी स्थानिकांची बाजू मांडली.
त्याचबरोबर त्याठिकाणी नव्याने सुरू असलेल्या बांधकामाला जिल्हाधिकारी देशमुख यांनी तोंडी स्थगिती दिली आहे. मुळातच याठिकाणी प्रकल्प बाधित शेतकरी ही जागा स्वतःच्या नावावर करून याठिकाणच्या जमीन खरेदी – विक्री दलालांना विकत असल्याने केवळ बोटावर मोजण्याइतकेच प्रकल्प बाधित शेतकरी याठिकाणी वास्तव्यास आलेले आहेत. असं मत स्थानिकांनी मांडले, यावेळी अडीच ते तीन तास शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलिस प्रशासनाचा लवाजमा पहायला मिळाला. उद्या गुरुवारी (दि. ५) रोजी न्यायालयात जिल्हाधिकारी यांनी अहवाल सादर केल्यानंतर न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!